मुरूड ः प्रतिनिधी : सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र येणे आवश्यक आहे. यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन होणेसुद्धा महत्त्वाचे आहे. दोन समाज एकत्र आल्याने मतभेद दूर होऊन बंधुत्त्व भावना वाढीस लागण्यास मदत होणार आहे. आपण सर्व एक आहोत ही भावना वृद्धिंगत होण्यासाठी रोजा इफ्तार पार्टी महत्त्वाची असून यामधूनच सामाजिक सलोखा निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस उपअधीक्षक दत्तात्रेय निगोठ यांनी मुरूड येथे केले.
सर्व समाजातील जातीजमातींमध्ये सलोखा वाढावा आणि पोलीस प्रशासनाविषयी असणारे गैरसमज कमी व्हावे यासाठी मुरूड पोलीस ठाण्याच्या वतीने मुस्लिम समाज बांधवांसाठी रमजानच्या दिवशी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस विभाग सर्व समाजासाठी मदतीचा हात पुढे करेल तसेच समाजात एकोपा असेल, तर समाज पुढे जाण्यास त्याचा नक्कीच फायदा होतो, असे सांगून निघोठ यांनी या वेळी सर्वांना ईदच्या शुभेच्छाही दिल्या.
मुरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साबळे यांनी सांगितले की, हिंदू-मुस्लिम समाजातील सर्व सण एकत्रितपणे साजरा होणे आवश्यक आहे. इफ्तार पार्टीचे आयोजन हे सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहे. अशा सणांमुळे हिंदू-मुस्लिम बांधव मनापासून एकत्र येतात. त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते. या वेळी मुरूड तहसीलदार परीक्षित पाटील यांनीही सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी पोलीस उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय निघोठ, पोलीस निरीक्षक किशोर साळे, वैद्यकीय अधिकारी सुमया शेख, उपनिरीक्षक विजय गोडसे, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश दांडेकर, नगरसेवक विजय पाटील, मनोज भगत, अशोक धुमाळ, प्रमोद भायदे, माजी तहसीलदार नयन कर्णिक, अजित कासार, विजय गिदी, भंडारी समाज अध्यक्ष बाबू सुर्वे, माजी उपनगराध्यक्ष अतिक खतीब, नगरसेवक पांडुरंग आरेकर, जहूर कादिरी, समीर दवनाथ, विजय भोय, कुणाल सतविडकर आदी उपस्थित होते.