कर्जत : बातमीदार
नेरळ गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि त्याचा प्रयत्य नेरळ गावातील विविध चौकांना देण्यात आलेल्या नावांवरून येतो. नेरळ ग्रामपंचायतीने त्या सर्व महापुरुष, हुतात्मे, संत यांची नावे या चौकांना दिली आहेत आणि त्याच नेरळ ग्रामपंचायतीला आता त्याचा विसर पडला आहे. दरम्यान, नेरळ गावातील बहुतेक चौकांना जाहिरात फलक आणि वाहनांचा गराडा पडलेला असतो, मात्र त्याबाबत नेरळ ग्रामपंचायतीला त्याचे काहीही सोयरसुतक नाही.
नेरळमध्ये स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, तसेच संत महात्मे यांच्यासह या तालुक्यातील हुतात्मे भाई कोतवाल, हिराजी पाटील, नाग्या कातकरी, स्वातंत्र्यसैनिक भगत मास्तर यांची नावे विविध चौकांना दिली आहेत. या सर्व चौकांची स्वच्छता दररोज करणे हे नेरळ ग्रामपंचायतीचे काम आहे, मात्र नेरळ ग्रामपंचायतीचे अशा कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
आज त्या सर्व चौकांच्या आजूबाजूला जाहिरात फलक लटकलेले दिसून येत आहेत, तर दिवसभर या चौकाच्या नामफलकाजवळ दुचाकी वाहने पार्क करून ठेवलेली दिसून येतात.
भाजीपाला किंवा टोपली घेऊन देखील फेरीवाले या पाट्यांच्या खाली पथारी मांडून बसलेले असतात. त्यांना तेथे बसू न देणे आणि जाहिरात फलक लावू न देणे ही खबरदारी नेरळ ग्रामपंचायतीने घेण्याची आवश्यकता असताना नेरळ ग्रामपंचायत मात्र हे सर्व पाहत आहे.