पाली : प्रतिनिधी
एसटी महामंडळ बरखास्त करून राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांनी पुकारलेल्या संप व आंदोलनाला भ्रष्टाचार निर्मूलन समिती रायगड यांच्याकडून पाठिंबा देण्यात आला. तसेच सुधागड पालीचे तहसीलदार दिलीप रायन्नावर यांच्यामार्फत मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांना पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले. या वेळी रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत हिंगणे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष मंगेश यादव, सुधागड तालुका अध्यक्ष संदीप सिलिमकर आदी उपस्थित होते.
या निवेदनामध्ये असे सांगण्यात आले आहे की, एसटी कर्मचारी यांच्या आंदोलनाच्या मागण्या सरकारने त्वरित मंजूर कराव्यात, तसेच दिनांक 10 नोव्हेंबर 2021 रोजी परिवहन मंत्री अनिल परब यांनी टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये 918 कर्मचार्यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश त्यांनी त्वरित मागे घ्यावेत अन्यथा एसटी कर्मचार्यांना सोबत घेऊन येत्या आठ दिवसांत भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्यासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल.