Breaking News

वस्तू आणि सेवांचे भारतीयकरण का झाले पाहिजे?

युरोपियन, अमेरिकन पायांच्या मापाचे वर्षानुवर्षे स्टँडर्ड मानून आपण त्या चपला-बुटांमुळे आपले पाय फेगडे झालेले सहन केले. पण आता त्यात बदल होतो आहे. असाच बदल आता सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात केला पाहिजे. अशा बदलांची अनेक उदाहरणे आजूबाजूला दिसू लागली आहेत. ज्याला भारतीयकरण म्हणता येईल, असे बदल जेथे जेथे होत आहेत त्या सर्व बदलांचे स्वागत केले पाहिजे.

एक आनंदाची आणि चांगली बातमी आहे. लवकरच भारतीयांना भारतीय मापाचे बूट आणि चपला घालायला मिळणार आहेत. आपण म्हणाल, आज पायात असलेले बूट आणि चपला भारतीय मापाच्या नाहीत का? तर त्याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. युरोपियन किंवा अमेरिकन कंपन्यांनी त्यांच्या देशातील नागरिकांच्या पायाच्या रचनेचा अभ्यास करून मापांचे सुसूत्रीकरण केले आणि त्यानुसार ते चपला, बुटांचा वापर करू लागले. आपल्या देशावर 150 वर्षे ब्रिटिशांनी राज्य केल्यामुळे आपणही त्यांचेच सगळे स्टँडर्डने वापरू लागलो. त्यानंतर आपण अमेरिकन कंपन्यांना प्राधान्य देऊ लागल्यामुळे अमेरिकन स्टॅनडर्ड आपण आपले मानले. याचा अर्थ ब्रिटनची पावणे आठ कोटी आणि अमेरिकेची 33 कोटी इतकी किरकोळ लोकसंख्या असूनही 140 कोटी लोकसंख्या असलेल्या भारत 2021 मध्ये त्यांचे स्टँडर्डने वापरतो आहे!

चपला-बुटांपुरते मर्यादित नाही

अर्थात, हे काही चपला-बुटांपुरते मर्यादित नाही. आपल्या वकिलांचा कोट किंवा न्यायाधीशांचा गणवेश असो, आपल्या पंचतारांकित हॉटेलांमधील खोल्यांची रचना असो, उंची मोटारींचा क्लीयरन्स असो, मोठ्या समारंभांमधील सूटबुटाची पद्धत असो. अशा किती गोष्टी सांगता येतील. ज्या आपण पाश्चात्यांच्या स्टँडर्डने आजही वापरतो आहोत. अनेक निकषांचे सुसूत्रीकरण करण्याची पद्धत त्यांनी आधी सुरू केली, म्हणून काही वर्षे ते निकष आपण मान्य केले. यात चुकीचे असे काही म्हणता येणार नाही, पण वर्षानुवर्षे तेच प्रमाण मानून वापरत राहणे हे मात्र निश्चितच चुकीचे म्हटले पाहिजे. इंग्रजी भाषेने बहुजन समाजाची जी गोची केली आहे तीच या सर्व पाश्चात्य निकषांनी कमी अधिक प्रमाणात केली आहे, पण आपल्यातील उच्चवर्गाने पाश्चात्य निकषांचा स्वीकार केला आणि बहुजन समाजाला त्याचा अनुनय करणे भाग पडले.

पायानुसार बूट की बुटानुसार पाय?

आता आधी आपण तो चपला-बुटांच्या मापांचा बदल नेमका काय होणार आहे ते पाहू. तुम्ही कोणत्याही चपला-बुटांच्या दुकानात गेला की जी मोजपट्टी तेथे ठेवलेली असते ती सध्या युरोपियन किंवा अमेरिकन स्टँडर्डची असते. त्यानुसार तुम्ही तुमच्या पायाला कोणत्या मापाचा बूट किंवा चप्पल येते हे ठरवून टाकता आणि तेच माप तुमच्या पायाचे ठरते. पायाचे माप आणि बूट चपलाचे माप जुळते, पण तो बूट किंवा चप्पल तुम्हाला पूर्ण समाधान देत नाही. असा अनुभव जर आपण घेतला असेल तर तुम्ही युरोपियन किंवा अमेरिकन साईजच्या स्टँडर्डनुसार बूट-चप्पल घालून फिरत आहात हे नक्की. कारण युरोपियन, अमेरिकन ही आपल्यासारखीच माणसे असली तरी त्यांच्या पायाचा आकार आपल्यापेक्षा किंचित वेगळा असतो, पण त्यांचे निकष आपण मान्य केल्यामुळे आपण इतकी वर्षे त्याच मापाचे स्टँडर्ड आपले मानले. याचा दुसरा अर्थ आपल्याला चालताना जो काही त्रास होतो किंवा पायात जे काही बदल होतात, ते आपण मान्य करून टाकले! यात आता बदल होणार आहे. सरकारच्या प्रमोशन ऑफ इंडस्ट्रीज आणि इंटरनल ट्रेड या खात्याने यात पुढाकार घेतला आहे. चेन्नई येथील सेन्ट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट भारतीय नागरिकांच्या पायांचा अभ्यास करून त्यांच्या मापांचे प्रमाणीकरण ही संस्था करणार आहे.

भारतीय समाजाची कोंडी

अशा प्रमाणीकरणाचा आपण अनेकदा फार विचार करीत नाही, पण ते फार महत्त्वाचे आहे, कारण हे प्रमाणीकरण 140 कोटी नागरिकांना लागू होत असते. त्यात किंचित जरी तफावत राहिली तर त्या चुकीचे परिणाम कोट्यवधी नागरिक वर्षानुवर्षे सहन करीत असतात. बुटा चपलांचा विषय म्हणजे तो एक छोटा विषय आहे, असे आपण एक वेळ म्हणू शकतो (अर्थात तेही बरोबर नाही.) पण सर्व क्षेत्रात आपण असे पाश्चात्य निकष महत्त्वाचे मानल्याने आणि त्यांना भारतीय पर्याय उभे न केल्याने फार मोठे नुकसान करून घेतले आहे. सुरुवातीला म्हटले तसे वकिलांचा काळा कोट, न्यायालयांना असलेल्या वारेमाप आणि अवेळी असलेल्या सुट्या,

न्यायदानाच्या पद्धती, मोठ्या हॉटेलांमधील पडदे, मग आणि बकेट नसलेले बाथरूम, नीट झोपही न येणार्‍या अतिगुबगुबीत गाद्या,  ही त्याची काही किरकोळ उदाहरणे, पण चांगले काय आणि वाईट काय, याचे जे निकष आपल्या मनात यामुळे पक्के झाले आहेत, त्यामुळे जी मानसिक कोंडी भारतीय बहुजन समाज सहन करतो आहे, त्याला अत्याचारच म्हटले पाहिजे.

भारतीय तज्ञांवर पगडा

भारतीय समाजाविषयीचे समाजशास्त्रीय आणि आर्थिक विश्लेषण करणारे कोणतेही पुस्तक वाचा किंवा कोणाचाही निबंध वाचा तुम्हाला लक्षात येईल की, त्या भारतीय तज्ज्ञाने त्या क्षेत्रातील पाश्चात्य तज्ज्ञाचे विचार आधी उधृत केले आहे. वास्तविक भारतीय समाज आणि आपला देश अनेक अर्थांनी इतका वेगळा आहे की, त्याला अनेक पाश्चात्य निकष लागू पडत नाहीत, पण आपल्याकडील तज्ज्ञांवर त्यांचा इतका पगडा आहे की त्यांचे ‘सुविचार’ वापरल्याशिवाय त्यांचे विश्लेषण पूर्ण होतच नाही. वास्तविक, ती विधाने जर एवढी महत्त्वाची असती तर त्याचे काही चांगले परिणाम इतक्या वर्षांत दिसायला हवे होते, पण त्याच्याशी त्यांना काही देणेघेणे नाही.

भारतीयकरणाचे स्वागत करूयात…

भारतीय अर्थव्यवस्थेने अलीकडे जी दिशा पकडली आहे, ती अशीच वेगळी म्हणजे भारतीय दिशा आहे. आत्मनिर्भर भारताच्या निमित्ताने मेट्रोचे डबे, छोटी विमाने अशा विदेशी उत्पादनांना पर्यायी शेकडो भारतीय उत्पादने देण्याचा प्रयत्न असो, भारतीय शेअर बाजार अनेकदा विदेशी बाजारांची फारकत घेत असल्याचे गेल्या वर्षातील प्रसंग असोत, दारिद्य्र निर्मूलनाचे भारतीय निकष ठरविण्याचे प्रयत्न असोत, भारतीय बियाणे आणि शेतीच्या पद्धतींचे संवर्धन करण्याच्या मोहिमा असोत.. हे सर्व चांगले बदल आहेत.

आठ कोटी विदेशी नागरिकांनी त्यांच्यासाठी निश्चित केलेले निकष जेव्हा भारतीय नागरिकांना लावले जातात, तेव्हा तब्बल 140 कोटी नागरिक स्वत:ला त्या निकषांमध्ये कोंबण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ, युरोपियन, अमेरिकन पायांच्या मापाचे स्टँडर्ड मानून आपण त्या बुटानुसार आपले पाय फेगडे झालेले सहन केले, पण आता त्यात बदल होतो आहे. असाच बदल आपण आता सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात केला पाहिजे आणि जेथे जेथे तो होत असेल, त्याचे स्वागत केले पाहिजे.

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply