कर्जत : प्रतिनिधी
कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराज यांच्या उत्सवानिमित्त शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेला कुस्तीच्या आखाड्यात शेवटची कुस्ती पुण्याचा दीपक मोहिते आणि येवल्याचा ज्ञानेश्वर केरे यांच्यात रंगली. मोहितेने केरे याला चितपट केल्याने तो अजिंक्य ठरला. मलंगगड भाल येथील कृष्णा ठोंबरे या दिव्यांग कुस्तीगीराने कुस्त्या चितपट करून सर्वांना अचंबित केले.
सकाळी नऊ वाजल्यापासून स्थानिक कुस्तीगीरांमध्ये कुस्ती होऊन कुस्त्यांना प्रारंभ झाला. कर्जत तालुका कुस्तीगीरी अध्यक्ष भगवान धुळे यांच्या हस्ते उद्घघाटन झाले. या वेळी ज्येष्ठ पंच मारुती ठाकरे, देवस्थानचे अध्यक्ष गणेश शिंदे, महेंद्र चंदन, सचिन दगडे, गौरव भानुसघरे, हेमंत पवार, अमित गुप्ता, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात 45 आणि दुपारच्या सत्रात 52 अशा एकूण 97 कुस्त्या झाल्या. सकाळच्या सत्रात शेवटची कुस्ती किरण काळण (कल्याण) आणि दीपक मोहिते (पुणे) यांच्यामध्ये चांगलीच रंगली व ती बरोबरीत सुटली. या कुस्तीसाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी 11 हजार रुपयांचे पारितोषिक ठेवले होते. दोन्ही सत्रात पंच म्हणून दीपक भुसारी, दत्तात्रय म्हसे, दत्तात्रेय पालांडे आणि मारुती ठाकरे यांनी काम पाहिले.
शेवटची महत्त्वपूर्ण कुस्ती पुण्याच्या दीपक मोहिते आणि येवल्याच्या ज्ञानेश्वर केरे यांच्यामध्ये रंगली. यामध्ये मोहिते याने केरेला चितपट करून अजिंक्यपद पटकावले. या कुस्तीसाठी कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी 21 हजार रुपयांचे रोख पारितोषिक ठेवले होते. सूत्रसंचालन दिलीप ठाकरे यांनी केले.
रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, नगरसेवक संतोष पाटील, बळीराम देशमुख, संतोष निलधे, भानूदास मिसळ, स्वप्नील पालकर आदींनी या आखाड्याला भेट दिली. या कुस्ती स्पर्धेत मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, नाशिक आदी भागांतून आलेले पैलवान सहभागी झाले होते. कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागातून आलेले असंख्य कुस्तीप्रेमी या वेळी उपस्थित होते.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …