नवी मुंबई : बातमीदार
स्वच्छ सर्वेक्षण 2022ला सामोरे जाताना शहर स्वच्छतेत प्राण्यांचाही विचार करीत ’पेट कॉर्नर’सारखी महत्वाची आणि उपयोगी अशी आगळीवेगळी संकल्पना नवी मुंबई पालिकेने राबवली आहे. संगीतकार-गायक शंकर महादेवन यांच्या हस्ते देशातील ह्या पहिल्या पेट कॉर्नरचे लोकार्पण करण्यात आले.
या वेळी महापालिका आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, प्रशासन विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, शहर अभियंता संजय देसाई, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, वाशी विभाग अधिकारी सुखदेव येडवे आदी उपस्थित होते.
पाळीव प्राण्यांना शौचासाठी सार्वजनिक ठिकाणी घेऊन येणार्या नागरिकांनी शहर स्वच्छतेच्या दृष्टीने त्यांच्या विष्ठेची स्वत: विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. तसे न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. एका बाजूने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करताना त्यांना त्यासाठी पर्यायी योग्य व्यवस्था उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याचे लक्षात घेत पेट कॉर्नर ही अभिनव संकल्पना नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्याचे निश्चित करण्यात आले व आज पहिला पेट कॉर्नर सुरू झाला. अशाप्रकारे सर्व विभागांमध्ये पहिल्या टप्प्यात 18पेट कॉर्नर निर्माण करण्यात येत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
सेक्टर 29 वाशी येथील नाल्याशेजारील हरीत पट्टयाच्या बाजूला 10 ु 12 फूट आकाराच्या खोलगट जागेत वाळू टाकून त्या ठिकाणी पेट कॉर्नरची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्या परिसरातील नागरिकांनी आपल्या घरातील पाळीव प्राण्यांना शौचासाठी या पेट कॉर्नरच्या वाळू टाकलेल्या ठिकाणी घेऊन येणे अपेक्षित आहे. पेट कॉर्नरच्या ठिकाणी प्राण्यांची विष्ठा उचलण्यासाठी आधुनिक प्रकारचे स्कूप ठेवलेले असून स्कूपने उचलेली विष्ठा टाकण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. या प्लास्टिक पिशव्या तेथे ठेवलेल्या कचरापेटीमध्ये टाकावयाच्या असून कचरापेट्या नियमित स्वच्छ करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे याव्दारे शहरातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणच्या अस्वच्छतेस प्रतिबंध होणार आहे.