समुद्र स्वच्छता, कोकण पर्यटनवाढीचा देणार संदेश
अलिबाग : प्रतिनिधी
प्रदूषणाने समुद्राची होणारी हानी थांबवून तो स्वच्छ राहण्यासाठी, कोकणातील पर्यटन वाढीसाठी आणि भटक्या जमातीतील मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्याचा संदेश घेऊन 11 वर्षीय ध्रुव जयराम, रुपेश जयराम आणि 61 वर्षीय डॉ. भगवान केंद्रे हे मुंबई ते गोवा ही सफर सागरी मार्गाने सायकलवर आठ दिवसांत पूर्ण करणार आहेत. या सफरीची सुरुवात शनिवारी (दि. 25) सकाळी अलिबाग समुद्रकिनार्यापासून झाली. या सफरीत ते रायगड, रत्नगिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनार्यांना भेट देऊन आपला संदेश देणार आहेत.
यामिनी खैरनार आणि कुणाल खैरनार यांच्या द ग्रीन माईंड कंपनीच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून सायकल सफरीचे आयोजन करण्यात येत आहे. या वर्षी त्यांनी सागरी मार्गाने मुंबई ते गोवा सायकल सफर आयोजित केली आहे. ध्रुव जयराम हा अकरा वर्षाचा मुलगा ठाणे येथील एका शाळेत सहावीत शिकत असून सायकलिंग करणे हा त्याचा छंद आहे. तो वडिलांसोबत ही सायकल सफर पूर्ण करणार आहे. लातूर येथील डॉ. भगवान केंद्रे (वय 61) हे गृहस्थही या सफरीत सहभागी झाले आहेत. मुंबई येथून ते सर्वजण बोटीने अलिबाग येथे दाखल झाले. शनिवारी सकाळी त्यांनी अलिबाग समुद्रकिनार्यापासून गोव्याकडे प्रयाण केले. रोज 50 ते 60 किलोमीटरचा सागरी मार्गाने प्रवास पूर्ण करून समुद्रकिनारी आपला संदेश देणार आहेत. 31 डिसेंबर रोजी ते गोवा येथे पोहचणार असून त्याठिकाणी त्याच्या सफरीची सांगता होणार आहे.