Breaking News

दिवाळीआधी निवडणुकीचा बार

महाराष्ट्र विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

सर्वांना उत्सुकता लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा अखेर झाली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून, दोन्ही निवडणुकांचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी म्हणजेच दिवाळीपूर्वीच जाहीर केला जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शनिवारी (दि. 21) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती

विधानसभा निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनचा (ईव्हीएम) वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात 1.80 लाख बॅलेट युनिट, 1.30 लाख कंट्रोल युनिट आणि 1.35 लाख व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर केला जाईल. सर्व यंत्रणांची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली असून ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी 6.50 लाख कर्मचार्‍यांची नियुक्ती करून त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सी-व्हिजिल व हेल्पलाइन

विधानसभा निवडणुकीत सी व्हिजिल या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. नागरिकांना कुठे आचारसंहितेचा भंग होत असल्याचे दिसून आल्यास सी व्हिजिल मोबाइल अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून तक्रार करता येईल. यासाठी राज्य व जिल्हा स्तरावर संपर्क केंद्र स्थापण्यात आली असून, तक्रार निवारणासाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. राज्य स्तरावर 24 तास ही सेवा सुरू राहणार आहे.

आचारसंहिता लागू

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली आहे. तिचे पालन करणे बंधनकारक असते. आचारसंहितेबद्दलची माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

सातार्‍याची पोटनिवडणूक लांबणीवर

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेसह देशातील लोकसभेच्या 64 जागांवरील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या सर्व ठिकाणी विधानसभेबरोबर म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी मतदान होईल, मात्र यात महाराष्ट्रामधील सातार्‍यातील पोटनिवडणुकीचा समावेश नाही. विधानसभा निवडणुकीनंतर ही पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply