Breaking News

पर्यटकांच्या स्वागतासाठी माथेरान सज्ज

कर्जत : बातमीदार

यावर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी नाताळपासूनच माथेरानमध्ये येण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या स्वागतासाठी माथेरानही सज्ज झाले आहे.

लोकल ट्रेन सर्वांसाठी खुली केली नसल्याने पर्यटक आपल्या खाजगी वाहनाने माथेरानला येऊ लागले आहेत. दस्तुरी येथील पार्किंगची व्यवस्था अपुरी पडत असल्याने  जुम्मापट्टी येथे पर्यायी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. नगरपालिकेने दस्तुरी प्रवेशद्वारावर ऑक्सिमीटर आणि थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था केली आहे.

ख्रिसमस आणि त्याला लागून आलेला रविवार या दिवसात पर्यटक मोठ्या प्रमाणात माथेरानमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे या वर्षाच्या शेवटच्या दिवशीही पर्यटक मोठ्या संख्येने माथेरानमध्ये येतील, असा विश्वास येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे.

ख्रिसमस आणि नवीन वर्षे स्वागतासाठी माथेरानमध्ये नेहमीच पर्यटकांची गर्दी असते, हे लक्षात घेऊन येथील हॉटेल व्यावसायिकांनी आपली हॉटेल्स सजविली आहेत. सर्व दुकाने, रेस्टॉरंट आणि हॉटेल्स पर्यटकांना सेवा देत आहेत. हॉटेलचे रूम्स सॅनिटायझर केले जात आहेत. हॉटेलमध्ये पर्यटकांची ऑक्सिमीटरने तपासणी केली जात आहे, अशी माहिती मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी दिली.

पर्यटकांना आनंद देण्यासाठी आम्ही तयारी सुरू केली आहे. अनेक हॉटेल्सच्या भाड्यात कपात करण्यात आली असून, पर्यटकांचे मनोरंजन करण्यासाठी पपेट शो, जगलर शो, मॅजिक शो, हौजी, कराओके यासारख्या खेळांचे आयोजन केले आहे.

-दिनेश वाधवानी, मालक, हॉटेल कुमार प्लाझा, माथेरान

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply