‘अँटीजेन’साठी तालुकास्तरावर स्वतंत्र पथके
अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संशयित रुग्णांची आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची त्वरित तपासणी करून त्यांचे विलगीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याकरिता तालुकास्तरावर स्वतंत्र पथक तयार करण्यात यावे, सदर पथकाद्वारे पंचायत समिती, तहसील कार्यालयांसह, इतर सरकारी कार्यालय व मोठ्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रामध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या आहेत.
रायगड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण संख्या व पॉझिटिव्हीटी रेट वाढताना दिसून येत आहे. त्यातच संशयित व त्याच्या संपर्कातील व्यक्तींच्या आरटीपीसीआर चाचणीचे निष्कर्ष येणेसाठी 5 ते 8 तासांचा कालावधी लागत असल्यामुळे त्या निष्कर्षाचा कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी फारसा उपयोग होत नाही. त्या उलट रॅपिड अँटीजेन टेस्टचा निष्कर्ष त्वरित मिळत असल्याकारणाने कोरोना रुग्ण शोधणे व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे शोध घेणे सोईचे होते, तसेच रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याकरिता स्वतंत्र पथक तयार करण्यात यावे. सदरच्या पथकाद्वारे पंचायत समिती, तहसील कार्यालय, तसेच इतर कार्यालय व मोठ्या ग्रामपंचायती कार्यक्षेत्रामध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
* भौगोलिक परिस्थितीनुसार प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय व पंचायत समिती येथील कार्यालयात जलद गतीने चाचणी वाढविणेसाठी कोविड अँटीजेन चाचणी केंद्र कार्यान्वित करावे, जेणेकरून रॅपिड अँटिजेन टेस्टची संख्या वाढविण्यास व कोविडचे तत्काळ लवकर निदान होण्यास मदत होईल व त्याचा फायदा सर्व नागरिकांस होईल.
* रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याकरिता स्वतंत्र पथक तयार करण्यात यावे. सदरच्या पथकाद्वारे पंचायत समिती, तहसील कार्यालय, तसेच इतर कार्यालय व मोठ्या ग्रामपंचायती कार्यक्षेत्रामध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात याव्यात.
* ज्या लोकांना ताप, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, धाप लागणे, अंगदुखी, अलीकडेच चव किंवा वास कमी होणे, थकवा आणि अतिसार येत असल्याची लक्षणे आढळल्यास तत्काळ कोविड अँटीजेन चाचणी करावी व चाचणी निगेटिव्ह आल्यास संबंधिताची आरटीपीसीआर चाचणी न चुकता करावी.
* सर्वच नागरिकांकडून सामाजिक अंतर पाळणे, नियमित हात साबणाने धुणे व मास्क वापरणे याबाबत स्थानिक वृत्तपत्र, प्रसार माध्यम, गाव दवंडी, घंटागाडी इ.च्या माध्यमातून आवाहन करण्यात यावे.
* आपल्या कार्यक्षेत्रातील कोविड केअर सेंटर कार्यान्वीत करुन ते आवश्यक त्या सर्व सोयी सुविधासह सुसज्ज ठेवावे.
* कोरोना लसीकरणाचे पहिले डोसेचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे व ज्यांचा दुसरा डोस घेण्याचा कालावधी होऊन गेला आहे त्यांना प्राधान्याने दुसरा डोस देण्याची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी.
* कोरोना पॉझिटीव्ह पेशंटकरिता औषधाची उपलब्धता प्रा. आ. केंद्रामध्ये ठेवावी.
* प्राथमिक आरोग्य केंद्रात 5 ते 10 लिटर क्षमतेची ऑक्सिजन यंत्रणा सुस्थितीत असतील याची खातरजमा करावी. आरोग्य कर्मचार्यांना यंत्रणा चालवण्याचे प्रशिक्षण द्यावे.