नवी मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबईतील विकासकामांना गती मिळावी तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लागावे, याकरिता बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. या वेळी नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. रामचंद्र घरत, महामंत्री डॉ. राजेश पाटील, माजी सभापती डॉ. जयाजी नाथ, माजी नगरसेवक अशोक गुरखे, सुनील पाटील, निलेश म्हात्रे, अविनाश भगत उपस्थित होते.
नवी मुंबई महापालिकेला स्वच्छतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याने, तसेच शासकीय सुपरस्पेशालिस्ट हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजची प्रक्रिया जलद केल्यामुळे आयुक्त अभिजित बांगर यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी महिला भवन व बालभवन उभारण्याकरिता सिडकोकडून भूखंड हस्तांतरण प्रक्रिया लवकरात लवकर करणे, सानपाडा येथील लायब्ररी उभारण्याची कार्यवाही सुरू करणे, बेलापूर विभागातील ग्रामस्थ महिलांना सद्गुरू बैठकीकरिता दिवाळे येथे समाज मंदिर बांधणे, नवी मुंबईमध्ये डास प्रतिबंधक उपचार करणे, बेलापूर गाव येथील नियोजित मार्केटचे भूमिपूजन करणे, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मुख्यालय असे नामकरण करणे अशा अनेक विषयांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
आयुक्त बांगर यांनीही सकारात्मक निर्णय घेत सदर सर्व विषय तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या वेळी उपस्थित रामचंद्र घरत, डॉ. जयाजी नाथ, अशोक गुरखे, सुनील पाटील यांनी आपापल्या प्रभागातील समस्या व मागण्या आयुक्तांपुढे मांडल्या.
कोरोना व ओमायक्रॉनचा प्रादूर्भाव पाहता सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल होणे ही काळाची गरज आहे. मेडिकल कॉलेज सुरू झाल्यास सामान्य घरातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. महिला भवन व बालभवन निर्माण झाल्याने नवी मुंबईतील महिला व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. सानपाडा येथे सुसज्ज असे ग्रंथालय निर्मिती होणार असल्याने नवी मुंबईच्या विकासात भर पडणार आहे. आपण केलेल्या मागणीचा पाठपुरावा करणे हा माझ्या कामाचा एक भाग असून जोपर्यंत संपूर्ण प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत असाच पाठपुरावा सातत्याने मी करत राहणार आहे.
-मंदाताई म्हात्रे, आमदार, बेलापूर