Breaking News

फक्त सीमेवरच नाही तर त्या पलीकडेही घुसून मारणार

संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला इशारा

धुळे ः प्रतिनिधी
भारतीय सैन्य हद्दीत घुसणार्‍या आणि सीमेपलीकडील अशा दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करू शकतो, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शेजारी राष्ट्र पाकिस्तानचे नाव न घेता दिला आहे. संरक्षणमंत्र्यांच्या  हस्ते शुक्रवारी (दि. 24) दोंडाईचा येथे विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
संरक्षणमंत्री सिंह म्हणाले की, सगळे बदलू शकतात, पण शेजारी बदलू शकत नाहीत. मला आपल्या शेजारी राष्ट्राला विचारायचे आहे की, त्यांना आपल्या देशाला अस्थिर करायचे आहे का? भारताने आजवर कुणावर आक्रमण केलेले नाही किंवा कब्जा केलेला नाही, पण जर भारताला एखाद्याने छेडले, तर त्याला भारत सोडणार नाही हे सांगत याआधी एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक नव्हते, परंतु आम्ही ते केल्याची आठवणही त्यांनी या वेळी करून दिली.
जेव्हापासून देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासून फक्त आश्वासने दिली गेली. त्या नेत्यांवरील विश्वास कमी झाला आहे, मात्र आम्ही जे बोलू ते करून दाखवू, असे सांगून 2019च्या जाहीरनाम्यात जे लिहिले होते ते पूर्ण करू, असे सिंह म्हणाले.
भाषणाला मराठीतून सुरुवात
धुळ्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन केल्यानंतर संरक्षणमंत्री सिंह यांनी उपस्थितांशी संवाद साधला. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. मला महाराष्ट्रात आल्यानंतर खूप आनंद होतो, असे सांगत मी उत्तर प्रदेशातून आलो असून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांचा जवळचा संबंध आहे. वीरांची भूमी म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे, असे ते म्हणाले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply