Breaking News

रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या 21 जागांसाठी आज मतदान

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या 21  जागांसाठी 60 उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत. त्यासाठी सहा नगरपंचायतीमध्ये मंगळवारी (दि. 18) मतदान होणार आहे. 19 तारखेला मतमोजणी होईल. जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका डिसेंबर महिन्यात पार पडल्या. मात्र ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे या सहा नगरपंचायतींमधील ओबीसी प्रवर्गासाठी राखीव 21 जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. पोलादपूर, म्हसळा, माणगाव, तळा, पाली या पाच नगरपंचायतींमध्ये प्रत्येकी चार तर खालापूर नगरपंचायतीमधील एक अशा या 21 जागा असून या जागांवरच सर्वच राजकीय पक्षांचे भवितव्य अवलंबून आहे. खालापूर नगरपंचायतीच्या एका जागेसाठी दोन  उमेदवार रिंगणात असून तेथे सरळ लढत होत आहे.  माणगावच्या चार जागांसाठी 10 उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे. म्हसळा नगरपंचायतीच्या चार जागांसाठी  आठ उमेदवार लढत आहेत. पोलादपूरात चार प्रभागातून 16 उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत. तळा आणि पाली नगरपंचायतीच्या प्रत्येकी चार जागांसाठी 14 उमेदवार निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत.

पोलादपूरमध्ये यंत्रणा सज्ज; पोलीस बंदोबस्त तैनात

पोलादपूर : प्रतिनिधी

येथील नगरपंचायत निवडणुकीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस आणि प्रशासन सज्ज असून, चार प्रभागातील मतदानावेळी कडक पोलीस बंदोबस्त आणि मतमोजणीवेळी दंगलविरोधी पथक तैनात करण्याचा निर्णय झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागातर्फे देण्यात आली आहे. नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या चार जागांसाठी 16 उमेदवार भवितव्य अजमावत आहेत. त्यासाठी आज मतदान घेण्यात येत आहे. मतदानाच्या दिवशी दोन पोलीस अधिकारी, 35 पोलीसकर्मी व चार वाहतूक पोलीस अशी यंत्रणा सज्ज ठेवली आहे तर निकालावेळी चार पोलीस अधिकारी, 40 पोलीस व एक दंगलविरोधी पथक तैनात ठेवण्यात येणार आहे.

माणगाव नगरपंचायतीच्या चार जागांसाठी 10 उमेदवार, प्रशासन सज्ज

माणगाव : प्रतिनिधी

येथील नगरपंचायतीच्या चार जागांसाठी आज (दि. 18) निवडणूक असून त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक होत असलेल्या चार वार्डात एकूण 3325 मतदार असून, त्यामध्ये 1695 पुरुष आणि 1630 महिला मतदार आहेत. शहरातील चार मतदान केंद्रात ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. माणगाव नगरपंचायतीचे एकूण 17 वार्ड व 17 नगरसेवक आहेत. त्यापैकी 13 जागांसाठी यापूर्वीच 21 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले असून उर्वरित  वार्ड क्र. 6, 8,14 व 17 या वार्डांत आज मतदान होत आहे. नगरपंचायतीच्या वार्ड क्र.6 मध्ये हर्षदा सतीश सोंडकर आणि स्नेहा नितीन दसवते यांच्यात तर वार्ड क्र. 8 मध्ये नंदिनी नितीन बामगुडे आणि चेतना मंगेश निंबाळकर यांच्यात सरळ लढत होणार आहे. वार्ड क्र.14 मध्ये मयूर दिलीप शेट, सचिन मारुती बोंबले आणि राजा गौरू भोनकर तर वार्ड क्र.17 मध्ये दिनेश बाळकृष्ण रातवडकर, महामूद फकरुद्दीन धुंदवारे, रवींद्र भिकू मोरे यांच्यात तिरंगी लढत आहे. मतदानाकरिता तीन पोलीस अधिकारी आणि 37  पोलीस कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.  माणगाव नगरपंचातीच्या एकूण 17 जागांची मतमोजणी बुधवारी (दि. 19) जानेवारीला सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply