मोहोपाडा : प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून रसायनी परिसरात कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली असून सर्दी, खोकला व तापाच्या आजाराचे रुग्णदेखील मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. थंडी मोठ्या प्रमाणात वाढू लागली असून साथीचे आजार वाढत आहेत. सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या व्हायरल तापामुळे घरोघरी सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण आढळत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. रसायनी परिसरातील रिस, चांभार्ली, मोहोपाडा, वावेघर येथील रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे दिसून येते. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करून सोशल डिस्टन्सिंग ठेवून वेळोवेळी काळजी घ्यावी. लक्षणे आढळल्यास घराबाहेर जाणे टाळावे. त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे व ज्यांचे लसीकरण राहिले आहे. त्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.