Breaking News

पेण येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि खून प्रकरण; अलिबाग विशेष पोस्को न्यायालयात सुनावणी सुरू

अलिबाग : प्रतिनिधी

पेण तालुक्यातील मळेघर आदिवासीवाडीतील तीन वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार करून तिला जीवे मारण्याची घटना 29 डिसेंबर 2020 साली घडली होती. या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी विशेष पोस्को न्यायालयात सोमवार (दि. 17) पासून सुरू झाली. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांनी तक्रारदार आणि पंच यांची साक्ष तपासली असून आरोपी पक्षाकडूनही उलट तपासणी घेण्यात आली आहे. 14 ते 16 फेब्रुवारी असे सलग तीन दिवस या खटल्याची सुनावणी सुरू राहणार असून 15 साक्षीदार तपासणार असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. भूषण साळवी यांनी दिली आहे. मळेघर आदिवासीवाडीमधील तीन वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा पोलिसांनी या घटनेचा तपास करून आरोपी आदेश पाटील याला अटक केली. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून अलिबाग येथे शिक्षा भोगत होता. पॅरोलवर तो घरी आला असता त्याने हे कृत्य केले. पेण पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी राजकीय तसेच सामाजिक संघटनांनी केली होती. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून राज्य शासनाने अ‍ॅड. उज्वल निकम याची नियुक्ती केली आहे. जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. भूषण साळवी हे सहाय्यक म्हणून काम पाहत आहेत. पेण पोलिसांनी आरोपी विरोधात अलिबाग येथील पोस्को न्यायालयात खटला दाखल केला आहे. सोमवारी या खटल्याची सुनावणी न्या. शहिदा शेख याच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे तक्रारदार आणि पंच याची तपासणी साक्ष घेण्यात आली. आरोपी पक्षातर्फेही उलट तपासणी घेण्यात आली.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply