कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील मानिवली गावचे सुपुत्र आणि 1942च्या चलेजाव आंदोलनात सहभागी झाल्यानंतर हुतात्मा झालेले हिराजी गोमाजी पाटील यांची 108वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मानिवली येथील हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मारकात कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने जयंती उत्सवाचा सोहळा आयोजित केला होता.
मानिवली येथील हुतात्मा हिराजी पाटील स्मारक येथे कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने हुतात्मा हिराजी पाटील यांची 108वी जयंती साजरी करण्यात आली. त्या वेळी तेथील हुतात्मा हिराजी पाटील यांच्या अर्धपुतळ्याला संघटनेचे अध्यक्ष सावळाराम जाधव यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्या वेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक वसंत कोळंबे, ग्रामपंचायतचे सरपंच तुषार गवळी, हुतात्म्यांचे नातेवाईक वामन पाटील, जयराम गवळी, रमेश गवळी, अनसूया जामघरे, तसेच शरद भगत आदीसह संघटनेचे सचिव शिवराम बदे, खजिनदार शिवराम महाराज तुपे आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलन झाल्यानंतर नेरळ येथील स्वर अनुभूती अविष्कार प्रस्तुत क्रांतिकारक यांच्या जीवनावरील समर गीतांचा कार्यक्रम सादर झाला. संगीत विशारद कल्पना क्षीरसागर यांच्या समूहाने देशभक्तीपर गीते सादर केली. यानंतर आयोजित कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, माजी सभापती एकनाथ धुळे हे उपस्थित होते.
या वेळी इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी हुतात्मा हिराजी पाटील यांचा जीवनपट व्याख्यानाच्या माध्यमातून मांडला, तर तरुण व्याख्याता अविनाश भोईर आणि कांबरी यांनी हिराजी पाटील यांच्या जीवनावर भाषणे केली. शूरवीर तरुण मयूर शेळके यांनी आगरी समाज संघटनेला 5 फूट उंचीची पितळेची समई भेट दिली. कार्यक्रमाचे नियोजन समाज संघटनेच्या तरुण कार्यकर्त्यांनी केले होते.