मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड नगर परिषद हद्दीतील गणेश पाखाडीजवळील प्रवासी शेड मोडकळीस आली असून असंख्य प्रवासी व विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून मुरूड नगर परिषदेने या प्रवासी शेडची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी मानव अधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी यांनी केली आहे. गणेश पाखाडीमधील असणार्या प्रवासी शेडचा उपयोग असंख्य विद्यार्थी व लोकांना होत आहे. कारण या शेडजवळ अंजुमन हायस्कूल व सर एस. ए. हायस्कूल अशा शाळा आहेत. ही प्रवासी शेड पावसाळ्यापूर्वीच तुटली असून अगोदरपासूनच शेड दुरुस्त करण्याची सजगता मुरूड नगर परिषदेने न दाखवल्यामुळे पावसाळी हंगामात शेकडो विद्यार्थ्यांना भिजत उभे राहावे लागल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे. मुरूड नगर परिषदेच्या अखत्यारित फारच थोड्या प्रवासी शेड असताना त्यांनाही शेड दुरुस्त करण्यासाठी मोठा कालावधी द्यावा लागत आहे याबद्दल फकजी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.