मुरूड : प्रतिनिधी
वहिवाटीच्या जागेवरील अनधिकृत बांधकाम तोडून टाकावे, या मागणीसाठी मुरूड तालुक्यातील विहूर बौद्धवाडीतील रंजना तांबे यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. या प्रकरणी गटविकास अधिकार्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर रंजना तांबे यांनी दुसर्या दिवशी आपले उपोषण स्थगित केले.
शेजारी मोनीश तांबे व महेंद्र तांबे यांनी स्वतःच्या घराचे वाढीव बांधकाम ग्रामपंचायतीची परवानगी न घेता त्याचप्रमाणे दोन घरामधील अंतर न सोडता केल्यामुळे वहिवाट हक्क गमावला असून, प्रशासनाने हे अनधिकृत बांधकाम तोडून टाकावे, या मागणीसाठी रंजना तांबे यांनी मुरूड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. तहसीलदार रोहन शिंदे यांनी त्याची गंभीर दखल घेत गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना महिलेस न्याय मिळवून देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार प्रभारी गटविकास अधिकारी सुभाष वाणी व विहूरचे ग्रामसेवक संतोष नागोठकर यांनी बुधवारी संध्याकाळी उपोषणकर्त्या रंजना तांबे यांची भेट घेऊन चर्चा केली.
वादग्रस्त जागेची मोजणी करून उपलब्ध नकाशानुसार वाढीव बांधकाम आढळून आल्यास ते तोडण्यात येईल. मोजणी प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत वाढीव बांधकाम जैसे थे ठेवण्याचे आदेश मोनिश आणि महेंद्र तांबे या दोघांनाही देण्यात येतील, तसेच वहिवाट हक्क मोकळा करून देण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी सुभाष वाणी व ग्रामसेवक संतोष नागोठकर यांनी या वेळी रंजना तांबे यांना दिले. त्यानंतर रंजना तांबे यांनी बुधवारी संध्याकाळी ग्रामसेवक नागोठकर यांच्या हस्ते लस्सी देऊन उपोषण स्थगित केले. या वेळी विहूरच्या सरपंच निलीशा दिवेकर, उपसरपंच नितेश दळवी, ग्रामपंचायत सदस्य मुश्रत उलडे, फैसल उलडे, माजी सरपंच इकरार मोदी, सज्जाद उलडे आदी उपस्थित होते.