पोलादपूर : प्रतिनिधी
राज्यात तापमानाचा पारा सातत्याने वर चढत असताना कोकणातही उष्मा वाढत असून, पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ येथे रविवारी (दि. 28) 44 अंश एवढ्या तापमानाची नोंद मोबाईलमध्ये दिसून आली. सर्वसाधारणपणे राज्यात विदर्भात उष्णतेचा भडका उडालेला पाहावयास मिळतो, पण रखरखीत उन्हाच्या झळा आता कोकणातही जाणवू लागल्या आहेत. रविवारी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ येथे 44.5 अंश तापमान नोंदले गेले. हे तापमान कोकणातील सर्वाधिक असल्याचे म्हटले जाते. दरम्यान, या प्रचंड उन्हापासून बचाव करण्यासाठी व्यापार्यांकडून लोहारमाळ येथील दुकाने दुपारी बंद ठेवण्यात आली होती.
– असह्य उकाड्याने रायगडकर हैराण
अलिबाग : तापमानात वाढ झाल्यामुळे अंगाची लाहीलाही करणार्या उकाड्याने रायगडकर हैराण झाले आहेत. सकाळी 10 वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसायला सुरुवात होत असून, दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
रायगड जिल्ह्यात तापमानाची अधिकृत नोंद भिरा येथे घेतली जात असे, मात्र मागील वर्षी तेथे 46.5 इतके तापमान नोंदवले गेल्यानंतर त्याबाबत अनेक शंकाकुशंका उपस्थित करण्यात आल्या. ज्या टाटा जलविद्युत केंद्रात हे तापमापक बसवले आहे, तेथून जवळच दुसरे तापमापक हवामान विभागाने बसवले, परंतु तेथील तापमान हे जाहीर केले जात नाही. त्यामुळे तापमानाची अधिकृत आकडेवारी प्राप्त होत नाही.