Breaking News

कोलकाताची मुंबईवर सरशी

हार्दिक पांड्याची एकाकी झुंज अपयशी

कोलकाता : वृत्तसंस्था

आयपीएलमध्ये रविवारी (दि. 28) मुंबई इंडियन्सला कोलकाता नाईट रायडर्सकडून 34 धावांनी हार पत्करावी लागली. रसेलच्या (नाबाद 80) फटकेबाजीच्या जोरावर कोलकाताने मुंबईपुढे 233 धावांचे महाकाय लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याने प्रयत्नांची शर्थ करीत 91 धावांची खेळी केली, पण त्याची झुंज अपयशी ठरली.

233 धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करणारा क्विंटन डी कॉक भोपळाही न फोडता झेलबाद झाला. कर्णधार रोहित शर्मा पायचीत झाला व रोहितला तंबूचा रस्ता धरावा लागला.

डावखुरा फलंदाज एवीन लुईस याने फटकेबाजीचा प्रयत्न केला, मात्र आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. त्याने 16 चेंडूंत 15 धावा केल्या. धावगती वाढवण्याच्या नादात सूर्यकुमार रसलच्या कंटूर गोलंदाजीमुळे तो झेलबाद झाला. सूर्यकुमार यादवने 14 चेंडूंत 26 धावा केल्या. तुफान फटकेबाजीच्या जोरावर हार्दिक पांड्याने 34 चेंडूंत 91 धावा केल्या.

तत्पूर्वी, सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणार्‍या कोलकात्याच्या गोलंदाजांनी मुंबईवर पूर्णपणे वर्चस्व मिळवले. शुभमन गिल, ख्रिस लिन आणि आंद्रे रसेल यांनी मैदानात चौफेर फटकेबाजी करीत मुंबईच्या गोलंदाजांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. गिलने 45 चेंडूंत 76 धावांची खेळी करीत पुन्हा एकदा आपली उपयुक्तता दाखवून दिली. अर्धशतक झाल्यावर राहुल चहरने लिनचा अडसर दूर केला.

यानंतर मैदानावर आलेल्या रसलने गिलच्या साथीने फटकेबाजी केली आणि संघाची बाजू भक्कम केली. दोन्ही फलंदाजांनी पुन्हा एकदा मुंबईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. पांड्याच्या गोलंदाजीवर गिल माघारी परतल्यानंतर कार्तिकच्या साथीने रसेलने आपले अर्धशतक साजरे केले. रसेलने 40 चेंडूंत नाबाद 80 धावा ठोकल्या. मुंबईकडून पांड्या आणि चहरने प्रत्येकी एक बळी घेतला.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply