पनवेल : बातमीदार
कामोठ्यात मतदारांना पैसे वाटप करताना शेकाप कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडल्याची घटना ताजी असतानाच, रविवारी (दि. 28) सुकापूरमध्येही असाच प्रकार घडला. याप्रकरणी प्रताप रामचंद्र आरेकर या शेकाप कार्यकर्त्याला अटक करून त्याच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना मतदान करावे यासाठी पनवेलजवळील सुकापूर येथील शेकाप कार्यकर्ता प्रताप आरेकर हा रविवारी गोकुलधाम सोसायटीत मतदारांना पैसे वाटत होता. त्याला भाजप कार्यकर्ते आत्माराम गुणाजी पाटील यांनी हटकून पोलीस आणि निवडणूक भरारी पथकाला पाचारण केले. हे वृत्त समजताच जि. प. सदस्य अमित जाधव यांनीही घटनास्थळी जाऊन यंत्रणेला सतर्क केले.
या वेळी प्रताप आरेकर याची झडती घेतली असता, त्याच्याकडे पार्थ पवार यांच्या नावाच्या 78 कोर्या व मतदारांच्या चिठ्ठ्या आढळल्या. त्याचप्रमाणे 5800 रुपये रोख रक्कम असलेले 29 खाकी लिफाफे सापडले. प्रत्येक लिफाफ्यात 200 रुपयांच्या नोटा होत्या. याशिवाय एक लाल रंगाच्या पिशवीत रजिस्टर होते. त्यात साक्षी पार्क, जन्मोत्री, गोकुलधाम सोसायटी, श्रीनिकेतन, तपोवन, मातोश्री, साईकृपा, स्वर्णभूमी, सुंदरम अशी सोसायट्यांची नावे आणि सदस्यांची नावे लिहिलेली होती.
मतदारांना पैशांचे आमिष दाखविल्याने खांदेश्वर पोलिसांनी शेकाप कार्यकर्ता प्रताप आरेकरला अटक करून त्याच्या विरोधात भा.दं.वि. कलम 171 (इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सलग दुसर्या दिवशी पैसे वाटताना शेकाप कार्यकर्त्यांना पकडण्यात आल्याने शेकापसह मावळ लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना झटका बसला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.