शेतकरी संघर्ष समितीचा नागोठणे रिलायन्स व्यवस्थापनाला इशारा
पाली : प्रतिनिधी
रसायनमिश्रित सांडपाणी वाहिनी फुटून शिहू चोळे विभागातील शेतकर्यांचे सातत्याने नुकसान होत आहे, या नुकसानग्रस्त शेतकर्यांना विनाविलंब नुकसानभरपाई द्यावी; अन्यथा कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा शेतकरी संघर्ष समिती व नुकसानग्रस्त शेतकर्यांनी नागोठणे येथील रिलायन्स कंपनीला शुक्रवारी (दि. 28) निवेदनाद्वारे दिला.
नागोठणे येथील रिलायन्स कंपनीची रसायनमिश्रित सांडपाणी वाहिनीला गळती लागून शिहू चोळे विभागातील शेतकर्यांचे सातत्याने नुकसान होत असल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समिती व नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केला आहे. त्याबाबत वेळोवेळी तक्रारी अर्ज व नुकसानभरपाईची मागणी करूनदेखील नुकसानभरपाई मिळत नसल्याने बाधीत शेतकर्यांनी शुक्रवारी कंपनीच्या इस्टेट ऑफिसला धडक देत रिलायन्स व्यवस्थापनाला आपल्या मागणीचे निवेदन दिले. या वेळी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अनंत भुरे, रमेश घासे, नारायण म्हात्रे, धर्मा घासे, नामदेव घासे, भारती घासे, सुवर्णा घासे, नामदेव म्हात्रे, सखाराम गदमळे, धर्मा म. घासे, दिलीप घासे, सागर पाटील, लहु भुरे, कौसल्या पाटील, पूनम बैकर, हिराबाई भुरे, तृप्ती भोइर, झाकिबाई कुथे, सरस भोईर, पप्पी घासे आदी नुकसान बाधित शेतकरी उपस्थित होते.
रिलायन्स कंपनीचे रसायन मिश्रित सांडपाणी सुपीक जमिनीला नापीक करीत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. कंपनीने बाधीत शेतकर्यांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा आम्ही सर्व शेतकरी न्याय मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन करू.
-अनंत भुरे, अध्यक्ष, शेतकरी संघर्ष समिती