श्रीवर्धन जीवना कोळीवाडा, भरडखोल येथील शेकडो मच्छीमारांच्या प्रयत्नांना यश
श्रीवर्धन : प्रतिनिधी
येथील समुद्रात रविवारी दुपारनंतर बुडालेल्या लक्ष्मी विजय नौकेला बाहेर काढण्यात जीवना कोळीवाडा व भरडखोल येथील मच्छीमारांना यश आले आहे.
श्रीवर्धन जीवना बंदर येथील श्रीकृष्ण सहकारी मत्स्यव्यावसायिक संस्थेच्या अनिकेत लक्ष्मण रघुवीर यांची लक्ष्मीविजय (खछऊ चक 3 चच् 4192) नौका सुकाणू तुटल्यामुळे रविवारी दुपारनंतर भरकटली. तिला मुळगाव येथील खांडीमध्ये सुरक्षित ठिकाणी नेत असतांना दगडावर आदळल्याने नौकेला दांडा तरिबंदर टोकाजवळ जलसमाधी मिळाली होती. त्यावेळी नौकेवर असलेले अनिकेत रघुवीर, बाळकृष्ण रघुवीर, जयेश रघुवीर आणि गणेश कुलाबकर या चार खलाशांनी हे मुत्यूशी झुंज देत किनारा गाठला होता. या घटनेत नौकेसह जाळी मिळून एकूण सुमारे 12 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाले.
बुडालेली लक्ष्मीविजय नौका बाहेर काढण्यासाठी जीवना कोळीवाडा व भरडखोल येथील पाचशेपेक्षा जास्त मच्छीमार आपल्या छोट्या-मोठ्या नौका घेऊन मदतीला धावले होते. चार ते पाच तास अथक परिश्रम घेऊन त्यांनी नौकेला जीवना बंदरात खेचून आणले. त्यानंतर नौकेला पाण्यातून वर काढण्यासाठी शेकडो महिलांनी सहकार्य केले.