आठ गावांमधील महिलांची पायपीट सुरू, टँकरची मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
श्रीवर्धन : प्रतिनिधी : तालुक्यातील आठ गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे, मात्र त्याकडे श्रीवर्धन पंचायत समिती दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप टंचाईग्र्रस्त ग्रामस्थांकडून केला जात आहे.
श्रीवर्धन तालुक्यामधील साक्षीभैरी, कोढे पंचायतन, शेखाडी, साखरी, गुळधे (बापवली), नागलोली, आदगाव, धनगरमलई, या आठ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दोन हंडे पाणी मिळविण्यासाठी तेथील महिलांना मैलभर पायपिट करावी लागत आहे. काही ठिकाणी रात्रभर जागून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. याशिवाय तालुक्यातील दिघी, आराठी, भोस्ते, गौळवाडी, साखरी (गौळवाडी), बोर्लीपंचतन, मारळ, कारविणे, कार्ले, गुळधे, चिखलप, कुंभारवाडा, कुणबीवाडी, गालसूर, काटी, सर्वेमस्जिद, हुन्नरवली, धारवळी, काळींजे, बागमांडला कोळीवाडा, शिस्ते, कापोली, मारळ, गाणी इत्यादी गावे आणि अनेक वाड्यांवर पाणीटंचाईचे सावट आहे.
श्रीवर्धन तालुक्यामध्ये एकूण 72 गावे व वाड्या असून, त्यापैकी उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार्या 16 गावे व 37 वाड्यांना टँकर व बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी श्रीवर्धन पंचायत समितीने 77 लाख रुपये खर्चाचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यात सहा टँकरची तरतूद करण्यात आली आहे, मात्र मागणी करूनही टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत नसल्याने कृती आराखडा कागदावर राहिला असल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करीत आहेत.
गतवर्षी पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात 12 बोअरवेल मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी एकही बोअरवेल श्रीवर्धन तालुक्यामध्ये मारण्यात आलेली नाही. त्यामुळे मंजूर निधी परत गेला. या वर्षी पुन्हा तेवढ्याच बोअरवेलना मंजुरी मिळाली आहे.
भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेल्याने बोअरवेलना पाणी लागत नाही. भाडे परवडत नसल्यामुळे खाजगी टँकरवाले टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर देण्यास तयार होत नाहीत. तरीही टँकर मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
-प्रवीण सिनारे, गटविकास अधिकारी,श्रीवर्धन
मागील वर्षी 12 बोअरवेल मंजूर झाल्या होत्या, मात्र प्रशासनाने एकही बोअरवेल मारली नाही. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.
-बाबुराव चोरगे, उपसभापती, पंचायत समिती, श्रीवर्धन