Breaking News

नोकरभरतीत लोकप्रतिनिधींच्या नावाचा गैरवापर करणार्‍या इसमाविरोधात पोलिसांत तक्रार

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेत होत असलेल्या नोकरभरतीच्या अनुषंगाने पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नावाचा गैरवापर आणि जनतेची फसवणूक एक इसम करीत असल्याचे उघडकीस आले. या प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.
पनवेल महापालिकेची नोकरभरती रितसर ऑनलाईन अर्ज आणि केंद्रावर लेखी परीक्षा घेऊन होत आहे. असे असतानाही उमेदवारांना आमिष दाखवण्याचा प्रकार करण्यात येत असल्याचे ध्यानी आले. हे करणार्‍या इसमाच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात लेखी निवेदनाद्वारे तक्रार देण्यात आली आहे.
पनवेल महापालिकेच्या आकृतिबंधात मंजूर केलेल्या 41 संवर्गातील 377 विविध पदांसाठी नुकताच भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल झाल्यानंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा राज्यातील विविध केंद्रावर पारदर्शकपणे सर्व दक्षता घेऊन डिसेंबर 2023 या कालावधीत पार पडली. सर्व प्रक्रिया रितसर आणि पारदर्शक पद्धतीने होणार असल्याचे जाहीर करतानाच दरम्यानच्या काळात या सर्व प्रकियेत फसवणुकीचा प्रकार घडण्याची शक्यता आयुक्त गणेश देशमुख यांनी प्रसिद्धी माध्यमातून अधोरेखित केली होती. त्या अनुषंगाने तशी काळजीही या प्रक्रियेत घेण्यात आली, मात्र लेखी परीक्षेच्या वेळी पवई येथील केंद्रावर एका इसमाने पैसे घेऊन पनवेल महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष काही उमेदवारांना दाखवले तसेच माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचेही नाव घेतले. परेश ठाकूर यांची बदनामी आणि उमेदवारांची फसवणूक केल्याचा गंभीर गुन्हा त्या इसमाने केला आहे. त्या बाबींची गांभीर्याने दखल घेऊन नाहक बदनामी, नोकरभरतीत गैरप्रकार आणि उमेदवारांची फसवणूक करणार्‍या इसमाविरोधात पोलीस ठाण्यात लेखी निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे.

पनवेल महापालिकेत विविध पदांची नोकरभरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हिस ही कंपनी स्वतंत्रपणे काम करीत आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीच्या ओळखीचा किंवा शिफारशीचा संबंध येत नाही. नोकरभरतीच्या अनुषंगाने काही वेळा उमेदवारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न संधीसाधू इसमांकडून केला जातो. त्यामुळे कुणीही या अमिषाला बळी पडू नये आणि असाच काही प्रकार उमेदवारांसोबत झाला असेल तर त्यांनीही थेट पोलिसांत तक्रार करावी.
-परेश ठाकूर, माजी सभागृह नेते, पनवेल महानगरपालिका

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply