अलिबाग : प्रतिनिधी
कोकणातील शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. मजूर मिळाले तरी त्याचा खर्च परवडत नाही. शेतकर्यांच्या खर्चात बचत व्हावी, तसेच कमी मनुष्यबळ वापरून शेती करता यावी म्हणून कृषी विभागाने भातपेरणीचे ड्रमसीडर तंत्र पुढे आणले आहे. मागील वर्षी या तंत्राचा वापर करून रायगड जिल्ह्यात एक हजार हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी करण्यात आली होती. त्यामुळे रायगड जिल्ह्यात ड्रमसीडरला मागणी वाढली आहे.
रायगड जिल्हा हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता, परंतु शेती परवडत नसल्यामुळे शेतकरी आता ती करीत नाही. त्यामुळे शेतजमीन पडिक राहण्याचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना परवडेल असे आणि
कमी मनुष्यबळात शेती करता येईल असे ड्रमसीडर यंत्र विकसित करण्यात आले आहे. हे यंत्र वापरल्यामुळे थेट पेरणी करता येते. त्यामुळे लावणीसाठी होणारा खर्चही वाचत असल्याने जिल्ह्यात या यंत्राला मागणी वाढली आहे.
रायगड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात एक लाख चार हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे; तर नागली, इतर तृणधान्य, तूर, कडधान्य मिळून एक लाख 18 हजार हेक्टर क्षेत्र असणार आहे. त्याचप्रमाणे 24 हजार मेट्रिक टन रासायानिक खते सहा हजार मेट्रिक टन कीटकनाशके व बुरशी नाशके, महाबीजमार्फत 19 हजार क्विंटल भात बियाणे, 21 हजार क्विंटल संकरीत बियाणे राज्य शासनातर्फे रायगड जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.