Monday , February 6 2023

वणव्यांबाबत जनजागृती अभियान

महाड ः प्रतिनिधी

महाड वनविभागाकडून महाड आणि ग्रामीण भागात विद्यालयातून वणव्यांवर जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले. गेली अनेक वर्षांपासून याबाबत ठोस कारवाई होत नसल्याने तालुक्यातील वणव्यांचे प्रमाण कमी झाले नाही. या वेळी वन विभागाने जनजागृतीचे कार्यक्रम करून वणव्यांविरोधात वेगळी मोहीम आखली आहे. वनपरिक्षेत्र महाडच्या माध्यमातून वणवाविरोधी अभियान प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित केले गेले.

तालुक्यातील नाते, कोकरे आणि खरवली भागात वणवाविरोधी जनजागृती कार्यक्रम उपवनसंरक्षक राकेश सेपट यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले. महाड शहरातून याबाबत जनजागृती फेरीही काढण्यात आली. याकरिता वनप्रेमी सामाजिक संस्थांचे सहकार्य वनविभागाने घेतले. वनक्षेत्रपाल प्रशांत शिंदे यांनी याबाबत जनजागृती करताना वणव्यांमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा र्‍हास होत असून पर्यावरण संतुलनही बिघडत असल्याचे सांगितले. त्यामुळे वातावरणात उष्मा वाढल्याचे दिसून येते. याकरिता नागरिकांनी विशेषतः शेतकर्‍यांनी वणवा लावणे सोडून दिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. जनजागृती अभियानाला वनपाल विजय पवार, श्याम गुजर, रमेश देवरे, संजय नाईकनवरे, आदेश जाधव, वनरक्षक समीर जाधव, पी. डी.पाटील, यशवंत वांद्रे, वनप्रेमी सामाजिक संस्थेचे किशोर पवार आदी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. ग्रामीण भागात जेथे वणवा लागतो तेथे जनजागृती होणे आवश्यक आहे. बहुतांश वणवे शेतकर्‍यांच्या गैरसमजुतीने लावले जाताहेत. नैसर्गिक वणवा लागण्याचे प्रमाण आता कमी झाले आहे. गवत जाळल्यानंतर पुन्हा गवत मोठ्या जोमाने येते यातून हे वणवे लावले जात आहेत. याबाबत ठोस कारवाई अद्याप महाड तालुक्यात झाली नाही. यामुळे वणवे लागण्याचे प्रमाण कमी झाले नाही. यामुळे ग्रामीण भागात शेतकर्‍यांना याबाबत जागृत करणे आवश्यक आहे. त्यानुसार वनविभागाने नाते, कोकरे, महाड, खरवली येथील शाळा-विद्यालयांत जाऊन जनजागृती केली.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply