Breaking News

आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी! आमदार प्रशांत ठाकूर यांची पनवेल मनपा कर्मचार्यांना ग्वाही; लाँग मार्चला पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त

आपण सारे जण पनवेल महापालिका झाल्यापासून आपला परिसर स्वच्छ असावा, पालिकेचा परिसर स्वच्छ असावा यासाठी धडपडत असताना तुम्हाला आपल्या न्याय्य हक्क मागण्यांसाठी आंदोलन करावे लागत आहे यासारखे दुर्दैव नाही. तुम्ही उभारलेला लढा योग्य असून, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशा शब्दांत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी (दि. 22) पनवेल ते मंत्रालय लाँग मार्चला पाठिंबा दिला. पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 ग्रामपंचायतींमधील कर्मचार्‍यांना महापालिकेत समाविष्ट न केल्याने म्युनिसिपल एमप्लॉईज युनियनने काढलेल्या लाँग मार्चला ते संबोधित होते. 

पनवेल महापालिका 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापन करण्यात आली. महापालिकेत पनवेल नगर परिषद व 29 गावांतील 23 ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला. या वेळी नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांचा महापालिकेत समावेश करण्यात आला. 23 ग्रामपंचायतींमधील 384 कर्मचार्‍यांपैकी 320 कर्मचार्‍यांना शासन गठित समावेशनात पात्र ठरवले गेले, पण अद्याप हे प्रकरण शासन स्तरावर प्रलंबित आहे.

रूपाली चौधरी या नऊ वर्षे कळंबोली ग्रामपंचायतीत काम करीत होत्या. पनवेल महापालिकेत अद्याप समायोजन प्रक्रिया झालेली नसल्याने त्या मस्टरवर आहेत. त्यांना अजून ग्रामपंचायतीचीच वेतनश्रेणी दिली जाते. म्हात्रे या 2012पासून ग्रामपंचायतीत काम करीत असताना त्यावेळी त्यांना ग्रामपंचायतीकडील 1500 आणि पंचायत समितीमधून 4500 असे एकूण सहा हजार रुपये मिळायचे. आता त्यांना फक्त 1500 रुपये दिले जात आहेत. या कर्मचार्‍यांनी 13 जानेवारीपासून महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. 22 जानेवारीपर्यंत प्रश्न न सुटल्यास काम बंद आंदोलन करून पनवेल-मंत्रालय लाँग मार्च काढण्याचा इशारा म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनने दिला होता. त्याची सुरुवात बुधवारी सकाळी 7 वाजता महापालिकेपासून संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश ठाकूर, संतोष पवार, अनिल जाधव, अनंत पाटील, विभागीय अध्यक्ष शैलेश गायकवाड, अरुण कोळी आणि हरिश्चंद्र कडू यांच्या नेतृत्वाखाली झाली. यामध्ये दीड हजारांपेक्षा जास्त कर्मचारी आणि त्यांची कुटुंबे सहभागी झाली. अनेक महिला आपल्या छोट्या मुलांना घेऊन आल्या होत्या. या वेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील, रवींद्र भगत आदी उपस्थित होते. 

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना शासन हे जाणते आणि जागृत असावे लागते, पण वारंवार मागण्या करून आणि लक्षात आणून देऊनही शासन जागे व्हायला तयार नाही. म्हणून आपल्याला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला. या ठिकाणी लहान मुले, महिला उपस्थित आहेत. त्यांचे पुढील भवितव्य हे या कामगारांवर अवलंबून आहे, ज्यांना आपले योगदान पूर्ण द्यावे लागते, पण हातात मात्र हजार-दीड हजार रुपये मिळतात. ही त्यांची चेष्टा असून ती आंदोलन केल्याशिवाय थांबत नाही. आपल्या आंदोलनाला यश लाभो. आम्ही आपल्यासोबत आहोत, असा विश्वासही त्यांनी दिला.

तुमची सेवा हवी, पण कर्मचारी नको, हा दुजाभाव आम्हाला मान्य नाही. भाजपची भूमिका आहे की तुम्हाला आडपडदा न ठेवता घ्यावे. समोरासमोर घ्यावे म्हणजे तुमचा विकास झाला की महापालिकेचा विकास होईल. तुम्हाला मानसन्मान मिळाल्यावर महापालिकेच्या सेवा नागरिकांना योग्य पद्धतीने मिळू शकतात. यासाठी तुम्हाला महापालिकेत समाविष्ट करून घ्यायलाच हवे. आपल्या आंदोलनाला आमच्या शुभेच्छा आणि साथ कायम राहील. -परेश ठाकूर, सभागृह नेते, पनवेल महानगरपालिका

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply