Breaking News

निर्बंध शिथिलतेमुळे पर्यटन क्षेत्र बहरले; रायगडातील समुद्रकिनारी तुफान गर्दी, स्थानिक व्यवसाय तेजीत

मुरूड : प्रतिनिधी

कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने शासनाने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील केले. त्या त्या विभागातील कोरोनाच्या रुग्णसंख्येनुसार तेथील स्थानिक प्रशासनाने निर्बंध हटविले. त्यामुळे नागरिकांची पावले पर्यटन क्षेत्राकडे वळू लागली आहेत. रायगडातील समुद्रकिनारे पर्यटकांनी बरहलेले दिसू लागले आहेत. पर्यटकांच्या येण्याने तेथील स्थानिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात तेजीत आहे. मुरूड व काशीद समुद्रकिनारी शनिवार, रविवार सुटीत पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. त्याचबरोबर सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठीसुद्धा मोठी गर्दी दिसून आली. गेल्या दोन दिवसांत 25 हजारांपेक्षा जास्त पर्यटक या ठिकाणी भेटी देऊन गेले आहेत. पर्यटकांची संख्या वाढल्याने हॉटेल, लॉजिंग व्यवसाय तेजीत होते.सर्वाधिक गर्दी काशीद येथे आढळून आली. येथे पर्यटकांच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. लोक मोठ्या संख्येने समुद्रकिनारी दिसून आले. जंजिरा किल्ल्याप्रमाणेच आता फणसाड अभयारण्यसुद्धा पर्यटकांना खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात यापेक्षा जास्त गर्दी होण्याचे संकेत मिळत आहेत. राजपुरी नवीन जेट्टी व खोरा बंदर येथून पर्यटकांना शिडाच्या व मशीन बोटीद्वारे जंजिरा किल्ल्यावर नेले जाते. या भागात मोठी गर्दी आढळून आली. खोरा बंदर येथेही रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांची तोबा गर्दी होती. त्याचप्रमाणे राजपुरी नवीन जेट्टी येथेसुद्धा गर्दी दिसून आली.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply