दुकानांमध्ये नागरिकांची, तर रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमध्ये सोमवार (दि. 7) पासून अंशतः अनलॉकच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अत्यावश्यक दुकाने, आस्थापनांसह अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानेसुद्धा आदेशानुसार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे पनवेल बाजारपेठेमध्ये नागरिकांची तुडुंब गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे प्रत्येक रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू लागली आहे. या सर्व उत्साहात काही लोक मात्र कोरोना पूर्ण गेला या भावनेने कोरोनाचे नियम विसरलेले दिसून आले.
सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत किराणा मालाची दुकाने, चिकन-मटण मासळी बाजार, भाजी मंडई, कपड्यांची दुकाने, मोबाईल स्टोअर्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणांची दुकाने, हॉटेल्स, खाद्यपदार्थांची दुकाने यासारखी विविध दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे अनेक दिवसांपासून विविध वस्तूंच्या खरेदीसाठी प्रतीक्षेत असणार्या नागरिकांनी सकाळपासूनच पनवेल शहरातील विविध ठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी दुकानांसमोर वाहनांच्या लांबलचक रांगा लावल्या होत्या. त्यामुळे त्यातून वाट काढताना नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती.
सोमवारी दिवसभर पनवेल शहरात नागरिकांची वर्दळ असल्याने तसेच काही नागरिकांनी भर रस्त्यावरच बेकायदेशीर वाहनांची पार्किंग केल्यामुळे शहरातील उरण नाका, टपाल नाका, एमटीएनएल मार्ग आदी ठिकाणी वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे रस्त्यावरून चालताना नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत होते. त्यातच व्यापार्यांच्या दुकानांसमोर नेहमीप्रमाणे अवजड वाहने उभी असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली. त्यातच सकाळच्या वेळी काही प्रमाणात पावसाची परिस्थिती असल्याने बाजारपेठ परिसरात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.
निर्बंधांचे उल्लंघन करणार्यांवर होणार कारवाई
पनवेल महापालिका तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 क्षेत्रात प्रशासनाकडून अंशतः अनलॉकिंग जारी करण्यात आला असला तरीही त्यात निर्बंधदेखील घालून दिले आहेत. त्यामुळे या निर्बंधांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. अनेक उपाययोजना आणि निर्बंधांमुळे पनवेलमध्ये कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणताना प्रशासनाची दमछाक झाली, परंतु काही नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवू नये यासाठी नागरिकांनीच काळजी घेणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.