Breaking News

‘खवल्या’प्रकरणी गुन्हा दाखल

पनवेल परिसरात दोन दिवसांत मांजर तस्करीची दुसरी घटना

पनवेल : वार्ताहर

वन्यप्राणी खवल्या जातीचा मांजर जवळ बाळगल्याने धनदौलत व ऐश्वर्य मिळते अशा गैरसमजेपोटी त्या प्राण्याची तस्करी व विक्री करण्याच्या उद्देशाने पनवेल परिसरात आलेल्या सात जणांना सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड व त्यांच्या पथकाने अटक केली आहे.

तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन गाड्यांसह बेशुद्ध अवस्थेत असलेला खवल्या मांजर हस्तगत करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी अशाचप्रकारे खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खवल्या मांजरासह एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती.

कळंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनेश बच्छाव यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एका अ‍ॅम्ब्युलन्स व क्वीड गाडीमधून पनवेल-मुंब्रा रोडने कळंबोली वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोरील बस स्टॉपजवळ काही अज्ञात इसम वन्य प्राण्याची तस्करी व विक्री करण्यासाठी येणार आहेत. त्यानूसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनेश बच्छाव, महिला पोलीस हवालदार अलका पाटील, पोलीस हवालदार ब्रह्मदेव जाधव, सुनील कानगुडे, संजय भोरे, कृष्णात माळी, पोलीस नाईक सचिन शेवाळे, किशोर टेकाळे, सावनकुमार इंगळे, पोलीस शिपाई संजय गीते आदींच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचून त्या दोन गाड्या अडवून गाडीमध्ये असलेले रमेश गणपत दाते (38 आनेगाव), सुनील नामदेव दाते (आनेगाव), मुकेश शंकर मोहिते (36, वाघजाई नगर), उमेश बबन पवार (32,  भरणा नाका), पांडुरंग सदाशिव चव्हाण (महाबळे), विजय रामचंद्र मोरे (35, रा. वेरळ), भगवान कोंडीबा माने (22, आरव) यांना ताब्यात घेवून अ‍ॅम्ब्युलन्स पाठीमागील दोन्ही शिटच्या मध्यभागी एका गोणपटात असलेली स्टीलची टाकी, त्यावर एक ब्लँकेट व टाकीत एक साधारण तपकीरी रंगाचा खवल्या मांजर त्याचे वजन सात किलो 790 ग्रॅम बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने या सात ही जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात वन्यप्राणी अधिनियम 1972चे कलम 51, 52 अन्वये गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही मांजर कोणाला देण्यासाठी घेऊन आले होते याचा शोध कळंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनेश बच्छाव करीत आहेत.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply