Breaking News

युक्रेनमधील युद्धाचा थरारक अनुभव; अलिबागमधील तरुणी सुखरूप घरी परतली

अलिबाग : प्रतिनिधी
वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेली अलिबाग तालुक्यातील धेरंड येथील पूर्वा पाटील पाच दिवसांच्या खडतर प्रवासानंतर मंगळवारी (दि. 2) सुखरूप घरी पोहचली. तिच्या स्वागतासाठी तिचे कुटुंबीय, नातेवाइक, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
पूर्वा वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेली होती. तिथे ती विनित्सा शहरात वास्तव्याला होती. रशियाने केलेल्या आक्रमणामुळे निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमध्ये पूर्वा युक्रेनमध्ये अडकून पडली होती. दोन दिवस पूर्वा व तिचे सहकारी बंकरमध्ये होते. अतिशय भयावह परिस्थिती होती. सतत लष्करी विमानांचे ताफे शहरावर सतत घोंगावत होते. अधूनमधून बॉम्ब आणि मिसाईल पडत होते. कानठळ्या बसविणारे सायरनचे आवज धडकी भरवत होते. अशा परिस्थितीतीतून आपण सुखरूप बाहेर पडू याची शाश्वतीच राहिली नव्हती, असे तिने सांगितले.
दोन दिवसांनी आम्ही युक्रेन सोडण्याचा निर्णय घेतला. एक बसची व्यवस्था केली. या बसने बॉर्डरच्या आठ किलोमीटर अलिकडे आम्हाला आणून सोडले. यानंतर आठ किलोमीटर चालत आम्ही सीमारेषेवर पोहचलो. या ठिकाणी खूप मोठी रांग लागली होती. हजारो विद्यार्थी उभे होते. दोन दिवस व एक रात्र या रांगेत मी उभी होती. दोन दिवसांनी रुमानिया देशात मला प्रवेश मिळाला. तिथे भारतीय दुतावासाने व्यवस्था केली होती. विद्यार्थ्यांसाठी रहाण्याची, अन्न-पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तिथून विमानतळापर्यंत जाण्याची सोयही भारतीय दुतावासाने उपलब्ध करून दिली. सहा तासांचा प्रवास करून सोमवारी रात्री मी तेथील विमानतळावर पोहचले. तिथून विमानाने मंगळवारी सकाळी मुंबईत दाखल झाले आणि तेथून अलिबागला घरी परतले.
हा प्रवास सोपा नव्हता. असे काही घडेल अशी स्वप्नातही वाटले नव्हते. घरी सुखरूप परतल्याचा नक्कीच आनंद झाला आहे, पण युक्रेनमधील नागरिक सुरक्षित नाहीत. युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनाही सीमारेषेपर्यंत येणे कठीण झाले आहे. या विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न व्हायला हवे, असे मत पूर्वाने या वेळी व्यक्त केले. युक्रेनमधून बाहेर पडणार्‍या भारतीय नागरिकांसाठी भारत सरकारने चांगली व्यवस्था ठेवली असल्याचे तिने या वेळी आवर्जून सांगितले.

युद्धाची परिस्थिती भयावह आहे. घराबाहेर पडणेही धोक्याचे बनले आहे. तिथे अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका व्हावी.  
-पूर्वा पाटील  

युद्धाला सुरुवात झाल्यापासून आम्ही सतत पूर्वाच्या संपर्कात होतो. तिच्याकडून माहिती घेत होतो. चार-पाच दिवस ती बिस्कीट व पाण्यावर होती. भारत सरकार आणि दूतावासाने केलेल्या मदतीमुळेच आमची मुलगी सुखरूप पोहचली. त्याबद्दल त्यांचे आभार. आज आमच्यासाठी मोठा आनंदाचा दिवस आहे.
-पराग पाटील, पूर्वाचे वडील

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply