पाच राज्यांतील दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत नेहमीप्रमाणे चिंतन झाले, नेहमीप्रमाणे गांधी परिवाराने पायउतार होण्याची तयारी दर्शवली आणि नेहमीप्रमाणेच कार्यकारिणीच्या निष्ठावान सदस्यांनी त्यांचा न दिलेला राजीनामा फेटाळला. या पराभवामधून काँग्रेस पक्ष काहीही शिकणार नाही हे तेव्हाच स्पष्ट झाले.
फार पूर्वीच्या काळी जत्रेमध्ये तमाशाचे फड लागत असत, तेव्हा कुठल्या तमाशा पार्टीचा वग झकास रंगतो याकडे रसिकांचे लक्ष असे. तमाशाच्या तंबूच्या कनातीमध्ये पंचक्रोशीतील प्रेक्षक तोच खेळ पुन्हा पुन्हा पाहात असत. कनातीच्या बाहेर एक बोर्ड कायमचा लिहून ठेवलेला दिसत असे – हाच खेळ उद्या पुन्हा. हे चार शब्द कुठल्याही क्रमाने उच्चारले तरी त्याचा अर्थ बदलत नाही. काँग्रेस पक्षाची नेमकी हीच अवस्था झालेली आहे. फरक इतकाच की, हाच खेळ उद्या पुन्हा हा बोर्ड बघून प्रेक्षक गर्दी करत असत. काँग्रेसचा खेळ बघणार्या प्रेक्षकांची संख्या दिवसेंदिवस तुरळक होऊ लागली आहे. कारण नेहमीच्या या खेळाचा लोकांना कंटाळा येऊ लागला आहे. हा खेळ आहे गांधी परिवाराच्या निष्ठेचा. या एकाच परिवारासमोर लोटांगण घालणार्या काँग्रेसी जनांचे आजही टोकाचे पाऊल उचलण्याइतके धाडस होत नाही. कुठल्याही निवडणुका आल्या की हाय कमांडसमोर जायचे, हाय कमांडच्या आदेशानुसार कशीबशी निवडणूक लढायची, निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ला की पुन्हा एकदा नेतृत्वबदलाची चर्चा करून गांधी परिवारासमोर निष्ठेच्या आणाभाका घ्यायच्या हेच या खेळाचे सूत्र राहिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये उरलासुरला काँग्रेस पक्ष संपूर्णत: नेस्तनाबूत झाला. हा पक्ष पुन्हा उभारी धरेल असे आता काँग्रेस कार्यकर्त्यांनाही वाटेनासे झाले असेल. या पाच राज्यांच्या निवडणुकांत काँग्रेसला कुठेच यश मिळाले नाही. गोव्यात गेल्या वेळी या पक्षाच्या 17 जागा होत्या. यंदाच्या निवडणुकीत ही संख्या 11 वर घसरली आहे. मणिपूरमध्ये असाच प्रकार घडला. उत्तराखंडातील पक्षांतर्गत बेदिलीमुळे साफ अपयश पदरी पडले. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसला चारही मुंड्या चीत केले. उत्तर प्रदेशात काँग्रेसची दारूण अवस्था झाली. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने संपूर्ण उत्तर प्रदेशात 399 उमेदवार उभे केले होते, त्यापैकी 387 जणांचे डिपॉझिट जप्त झाले. अवघे दोन उमेदवार कसेबसे निवडून आले. वास्तविक काँगेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पुढाकार घेऊन गेली दोन वर्षे उत्तर प्रदेश पिंजून काढला होता. त्यांचे रोड शोज माध्यमांमध्ये गाजत होते. परंतु असल्या दिखाव्याच्या रोड शोजमुळे मते मिळत नसतात हे त्यांच्या फार उशीरा लक्षात आले. रोड शोज करणे हा प्रचाराचा भाग झाला. परंतु त्याला प्रामाणिक समाजकारणाची जोड असायला हवी. पार्ट टाइम राजकारण करणार्यांना जनता नेहमीच धडा शिकवते हे प्रियांका गांधी यांनी आपले बंधु राहुल गांधी यांच्या अनुभवावरून तरी ओळखायला हवे होते. उत्तर प्रदेशातील प्रचार संपल्यानंतर प्रियांका गांधी यांनी ताबडतोब श्रमपरिहारासाठी राजस्थानातील एक आलिशान रिसॉर्ट गाठले. त्याचवेळी उत्तर प्रदेशातील निकाल जाहीर झाल्याच्या दुसर्या दिवशी सकाळी म्हणजे अवघ्या बारा तासांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद येथील रोड शोमध्ये सहभागी झाले होते. हा फरक लोकांना निश्चितपणे कळतो.