पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुर्णाकृती शिल्पाचे अनावरण
पनवेल : रामप्रहर वृत्त
गुणात्मक शिक्षण हे रयत शिक्षण संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असून त्या अनुषंगाने कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रयत संस्थेसाठी आदर्श वास्तू ठरणार आहे, असे प्रतिपादन ‘रयत’चे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी मंगळवारी (दि. 22) कामोठे येथे केले.
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पुर्णाकृती शिल्प उभारण्यात आले आहे. त्याचे अनावरण डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते व संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगिरथ शिंदे, स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे उपाध्यक्ष पी. जे. पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आर. डी. गायकवाड, मीनाताई जगधने, राजेंद्र उर्फ तात्या फाळके, आबासाहेब देशमुख, सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, माजी सचिव प्रा. गणेश ठाकूर, पश्चिम विभाग विभागीय चेअरमन राम कांडगे, मध्य विभाग चेअरमन संजीव पाटील, सहसचिव संजय नागपुरे, ऑडिटर डॉ. मेनकुदळे, ओएसडी शहाजी डोंगरे, जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, जनरल बॉडी सदस्य प्रशांत पाटील, विनायक पाटील, दशरथ भगत, सुधीर घरत, विभागीय अधिकारी आर. पी. ठाकूर यांच्यासह भाजपचे कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, जिल्हा उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, अॅड. आशा भगत, ’क’ प्रभाग समिती सभापती अरुणा भगत, नगरसेवक विकास घरत, विजय चिपळेकर, नगरसेविका कुसुम म्हात्रे, हेमलता गोवारी, संतोषी तुपे, युवा नेते राजेश गायकर, रवींद्र गोवारी, कामगार नेते सुरेश पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
भाषणाच्या सुरुवातीला बोलताना डॉ. अनिल पाटील यांनी, कर्मवीर अण्णांची समाधी आणि पुतळे आहे, मात्र शिल्प नव्हते. 750 शाखांमध्ये नाही ते कामोठे या शाखेत उभे केले आहे. त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे खास आभार मानत असल्याचे सांगितले. एक इंच जागा आणि एकही वीट जवळ नसताना कर्मवीर अण्णांनी संस्था स्थापन करण्याचे स्वप्न बघितले आणि ते प्रत्यक्षात आणले. गुणवत्तेकडे आयुष्यभर अण्णांनी लक्ष केंद्रित केले आणि आशिया खंडातील सर्वांत मोठी संस्था उदयास आली. 1995 सालानंतर रयत शिक्षण संस्थेने विविध उपक्रम राबविले आणि त्या अनुषंगाने दर्जेदार शिक्षण देण्याचे काम करीत शिक्षण क्षेत्रातील विविध यश प्राप्त केले. आमच्याकडे पाच महत्त्वाचे घटक आहेत. त्यामध्ये कर्मवीर अण्णा, रयत प्लांट, शरद पवारसाहेब, रामशेठ ठाकूरसाहेब आणि 16 हजार रयतसेवक आहेत. त्यामुळे संस्था अधिक जोमाने काम करीत आहे. रामशेठ ठाकूर यांनी दर्जाच्या बाबतीत कधीही तडजोड केलेली नाही. म्हणूनच कामोठे विद्यालयाची ही इमारत रामशेठ ठाकूर यांच्यामुळेच डौलाने उभी राहिली आहे. आधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न देण्याबरोबरच काळाप्रमाणे चालले पाहिजे, यामुळे जगाची भाषा असलेल्या इंग्रजीला डावलून चालणार नाही. तो उद्देश भावी पिढीच्या हितासाठी असून उद्योग, व्यवसाय, नोकरी, उन्नतीसाठी महत्त्वाचा आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण देणे हा रयत शिक्षण संस्थेचा मानस असून तो या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयातून सुरू होत आहे, असेही डॉ. अनिल पाटील यांनी आवर्जून नमूद केले तसेच कर्मवीर अण्णांच्या पूर्णाकृती शिल्पाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
या वेळी अध्यक्षीय भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी, आजचा दिवस माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असल्याचे सांगितले. कर्मवीर अण्णांचे पूर्णाकृती शिल्प पाहून मन भरून आले आहे. असा पुतळा व्हावा अशी मनापासून इच्छा होती. ती शिल्पकृतीतून पूर्ण झाली आणि त्याचे आज अनावरण झाले. ‘रयत’चे वातावरण माझ्या मनात भिनले आहे. ‘रयत’ माझ्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. अण्णांची समाधी आणि पुतळा पाहिल्यावर धन्य वाटते, त्याप्रमाणे येथील हे शिल्प प्रतिकृती आपल्याला प्रेरणा देत राहणार आहे.
अध्यक्षीय भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, या विद्यालयाच्या उभारणीत कामोठे व परिसरातील ग्रामस्थांनी कष्ट घेतले आहे. स्व. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या हस्ते या विद्यालयाच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. सुरुवातीला 12 वर्गखोल्या होत्या. संस्थेने मला ही शाळा दत्तक घ्यायला सांगितली. आता हे विद्यालय पाच मजली झाले आहे. रयत शिक्षण संस्थेचे पनवेलवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे पनवेल-उरणमध्ये शाखांचा विस्तार झाला असून हे विद्यालय रायगड विभागाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. स्टेट बोर्ड आणि आणि सीबीएसई बोर्डचे हे विद्यालय सर्व सुविधायुक्त झाले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रजी शिक्षण वाघिणीचे दूध आहे असे सांगत त्याचे महत्त्व पटवून दिले आहे आणि ती गरज ओळखून दर्जेदार शिक्षण देण्याचे काम केले जात आहे. सर्व समाजासाठी शिक्षण देण्याचे काम कर्मवीर अण्णांनी केले आहे. त्यामुळे अण्णांचे ऋण फेडण्याचे काम करीत राहू, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी अधोरेखित केले.
स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, कामोठे परिसरात देशाच्या विविध प्रांतातील लोकं वास्तव्यास आहेत. येथील हे विद्यालय कामोठ्यापुरते मर्यादित राहिले नाही, तर त्या पार गेले आहे. खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली रयत शिक्षण संस्था कार्यरत असून लोकनेते रामशेठ ठाकूर नेतृत्वाखाली या विद्यालयाचे स्ट्रकचर उभे राहिले आहे. येथील शिक्षणाचा दर्जा उत्तम असल्याने विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पालकांचा अट्टाहास असतो. प्रवेशाचा प्रतिसाद पाहता अनेक जणांना प्रवेश देता येत नाही. पुढच्या स्पर्धेसाठी विद्यार्थी तयार झाला पाहिजे यासाठी संस्थेची भूमिका आणि त्या निगडित सुविधा देण्याचे काम येथे होत आहे. वाढता प्रतिसाद पाहता या ठिकाणी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्डासाठी स्वतंत्र इमारत उभी करण्याची गरज पडणार आहे. यासाठी ग्रामस्थांचे आणि संस्थेचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आर. डी. गायकवाड हे 87 वर्षीय आहेत. अगदी या वयातही त्यांना स्वतःपेक्षा संस्थेच्या विकासही काळजी आहे, म्हणून ते सातारा येथून कामोठे येथे कार्यक्रमाला उपस्थित राहिले असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आवर्जून नमूद केले व त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला.
संस्थेचे उपाध्यक्ष भगिरथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, लोकप्रतिनिधी सतत समाजाच्या विकासासाठी तत्पर आणि जागृत असतो तेव्हाच त्याला जनप्रतिसाद लाभतो आणि विशेषतः महाराष्ट्रातील सर्वांत मोठा मतदार असलेल्या विधानसभेत निवडून येणे खाण्याचे काम नाही, तर तारेवरची कसरत आहे, मात्र आमदार प्रशांत ठाकूर सतत सर्व समाजासाठी काम करीत असतात. म्हणूनच हे नेतृत्व सर्वांत मोठ्या मतदारसंघातून सहज विजयी होतात. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिनंदन करू तेवढे कमी आहे. विद्यार्थी आणि पालकांची काळजी असणारे ते आहेत. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे कर्मवीर अण्णांना उमगले. म्हणून त्यांनी शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केली. ‘रयते’विषयी जीवापाड प्रेम असलेले रामशेठ ठाकूर यांचे नेतृत्व संस्थेत आले आणि संस्थेचे रूप विकासात पालटले. त्यांची स्वतःची जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था असतानाही प्रथम रयतला भरभरून दिले. मोखाड्यातील विद्यालयाला रामशेठ ठाकूर यांचे नाव देण्याचे आम्ही ठरवले, मात्र रामशेठ ठाकूर यांनी माझे नाव नको असे स्पष्ट सांगत आपल्या मनाचा मोठेपणा नेहमीप्रमाणे दाखवून दिला. ‘रयत’चे आधारस्तंभ म्हणून ते कार्यरत असून ‘रयत’साठी त्यांनी मोठे योगदान दिले असून रामशेठ ठाकूर यांच्या पावलावर पावले ठेवून त्यांचे कुटुंबीय आणि सहकारी काम करीत आहेत, असेही शिंदे यांनी नमूद केले.
या समारंभाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव विठ्ठल शिवणकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे यांनी मानले.
अण्णांची शिल्प प्रतिकृती आपल्याला प्रेरणा देत राहणार -लोकनेते रामशेठ ठाकूर
या वेळी अध्यक्षीय भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी, आजचा दिवस माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असल्याचे सांगितले. कर्मवीर अण्णांचे पूर्णाकृती शिल्प पाहून मन भरून आले आहे. असा पुतळा व्हावा अशी मनापासून इच्छा होती. ती शिल्पकृतीतून पूर्ण झाली आणि त्याचे आज अनावरण झाले. ‘रयत’चे वातावरण माझ्या मनात भिनले आहे. ‘रयत’ माझ्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. अण्णांची समाधी आणि पुतळा पाहिल्यावर धन्य वाटते, त्याप्रमाणे येथील हे शिल्प प्रतिकृती आपल्याला प्रेरणा देत राहणार आहे.
आजच्या काळाला अनुरूप शिक्षण देण्याचे काम रयत शिक्षण संस्था करीत आहे. सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्याला इंग्रजीचे शिक्षण मिळाले पाहिजे हा उद्देश घेऊन आणि नवनवीन आव्हान पेलण्याचे काम संस्था करीत आहे.
-आमदार प्रशांत ठाकूर, चेअरमन, स्थानिक स्कूल कमिटी