उरणमध्ये खराब फळाची विक्री; ग्राहकांची फसवणूक; आरोग्यही धोक्यात
उरण : प्रतिनिधी
उन्हाळी मोसम म्हणजे जांभळे, करवंदे, फणस आणि फळांचा राजा हापूस आंबा या रानमेव्याने ओथंबून गेलेला हंगाम याला उरण बाजारपेठ अपवाद नाही. कोणताही माल ग्राहकांच्या माथी मारण्यात तरबेज असणारे काही विके्रते बेमालूमपणे आंब्याची विक्री करत आहेत. ग्राहकांनी खरेदी केलेला हा आंबा कापून पहिला की एक डझन आंब्यांतील कमीतकमी तीन ते चार आंबे हे जाळीदार असल्याचे निष्पन्न होत असल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे.
काही विक्रेते हे आपण आंब्याची बागच विकत घेतल्याचे भासवून चक्क नवी मुंबई वाशीच्या फळबाजारांतून आणलेल्या पेट्यांतील आंबा हा आपल्याच बागेतील असल्याचे भासवून चढ्या भावात विक्री करतात. उरणच्या बाजारपेठेत अलिबाग-रेवसकडून येणारा आंबाही आपल्याच घरातील परसबागेतील आंबा असल्याचे भासवित विक्री करण्यात येतो, परंतु प्रत्यक्षात हा आंबा त्यांनी साठेवाल्यांकडून विकत घेतलेला असतो. यामध्ये काही आंबे विक्रेते हे वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे आंबा विकण्याचा व्यवसायही उरणच्या बाजारपेठेत करीत आहेत.
उरणच्या बाजारपेठेत बहुतांशी येणारा आंबा हा नवी मुंबई वाशीच्या फळ बाजारांतील येणार्या पेटीमधील आंबा आहे. हा वाशी बाजारात कोकणातील विविध भागांमधून येत असून वाशी बाजारात येताच काही घाऊक विक्रेते बेमालूमपणे यातील आंब्याची हेराफेरी करून पेटीचे पॅकिंग व्यवस्थितपणे करून उरणसारख्या बाजारपेठेत पाठवून देतात. आंबे तपासून घेण्याचे कोणतेही प्रमाण नसल्याने ते प्रत्यक्षात तपासून घेता येत नाहीत. त्यामुळे आंबे डझनाला 500 ते 600 रुपये इतका चढा भाव देऊनही घरी घेऊन गेलेल्या एक डझन आंब्यातून सुमारे तीन ते चार आंबे आतून जाळीदार झालेले निघतात व ग्राहकाचे नुकसान होते.
कधीकधी कोवळे आंबे अडीत टाकून पिकविलेले असतात तर कधी पडलेले आंबेही अडीत टाकून विक्रीस आणले जात आहेत. त्यामुळे आंब्यांना चढा भाव देऊनही ग्राहकांची फसवणूक होत आहे. आंबे कापल्यानंतर आतमध्ये ते जाळीदार निघतात आणि तो आंबा ग्राहक परत घेऊन गेल्यास आम्ही काय आंब्यात शिरून पहिले होते, असे उद्धटपणाचे काही विक्रेत्याचे उत्तर ऐकून घ्यावे लागते.
असे ओळखा चांगले आंबे
आंबे विकत घेणार असाल तर त्याला कोणतेही प्रमाण नसले तरी, बादलीभर पाण्यात आंबे टाकल्यास त्यातील जे आंबे पाण्यावर तरंगतील ते आतून हमखास जाळीदार अथवा खराब असतील आणि जे आंबे पाण्याच्या तळाला खाली जाऊन बसतील ते चांगले व खाण्यास योग्य आहेत असे समजावे. सध्यातरी हेच तपासणीचे प्रमाण सिद्ध झाले आहे.