कर्जत : प्रतिनिधी – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असून, पोलीस, नगर परिषद कर्मचारी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. त्यांच्यासह रस्त्यावर भाजी विके्रत्यांना रोटरी क्लब ऑफ कर्जतच्या वतीने मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
कर्जत पोलीस ठाण्याचे कर्मचारी चारफाटा, श्रीराम पूल, बाजारपेठ आदी ठिकाणी बंदोबस्तासाठी आहेत अश्या कर्मचार्यांना, तसेच नगर परिषद कर्मचारी जे सध्या नागरिकांच्या आयुष्याची काळजी घेत आहेत अशांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. याशिवाय खेडेगावातील महिला आपल्या शेतात पिकवलेल्या भाज्या घेऊन शहराच्या बाजारपेठेत विक्रीसाठी येत आहे. त्यांच्यातही जनजागृती करून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर कसा आणि का करायचा हे सांगून त्यांनाही वाटप करण्यात आले.
पोलीस ठाण्यात निरीक्षक अरुण भोर, नगर परिषदेत नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्याकडे मास्क आणि सॅनिटायझर सुपूर्द करण्यात आले. या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष हुसेन जमली, सेक्रेटरी जितेंद्र ओसवाल, सुनील सोनी, माधव भडसावळे, सतिश श्रीखंडे, विशाल शहा उपस्थित होते.