धाटाव : प्रतिनिधी
शहरातील कचरा थेट नदीपात्रात टाकण्यात येत असल्याने रोह्यातील कुंडलिका नदीचे डम्पिंग ग्राऊंड झाले आहे. त्यामुळे जलप्रदुषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोहा शहरातील कचरा कुंडलिका नदी किनार्यावर टाकण्यात येत आहे. हा कचरा हळूहळू नदीमध्ये मिसळतो. त्यामुळे जलप्रदुषणाबरोबरच आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाल आहे. कुंडलिका नदीकिनारी अष्टमी रोडलगत विकसीत करण्यात आलेल्या उद्यानात येणार्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.एकीकडे ‘स्वच्छ रोहा, सुंदर रोहा‘ च्या घोषणा द्यायच्या आणि दुसरीकडे नदी किनार्यालगत असलेल्या कचर्याकडे दुर्लक्ष करायचे, या रोहा नगर परिषदेच्या भूमिकेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नगर परिषदेने तत्काळ हा परिसर स्वच्छ करण्यासाठी पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
कुंडलिका नदी किनारी असलेल्या उद्याना लगतच कचरा टाकला जात आहे. तो नदीत जातो. त्यामुळे या परिसरातील लोकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. नगर परिषदेने येथील कचरा लवकर उचलावा.
-दीप वायडेकर, सामाजिक कार्यकर्ते,रोहा