नवी दिल्ली : वृत्तसंस्था
निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींपैकी एक असलेल्या अक्षयकुमार सिंह याची फाशीची शिक्षा कायम राहणार आहे. शिक्षेविरोधात त्याने दाखल केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि. 18) फेटाळली.
सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांना युक्तिवादासाठी प्रत्येकी अर्ध्या तासाची वेळ दिली होती. आरोपीच्या वकिलांनी या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर निर्भया प्रकरणातील आरोपी कोणत्याही प्रकारच्या दयेसाठी पात्र नाहीत. त्यांना फाशीचीच शिक्षा मिळाली पाहिजे, असे महाधिवक्ता जनरल तुषार मेहता म्हणाले. दोन्ही बाजूकडचे युक्तिवाद ऐकून आरोपी अक्षयकुमार सिंह याची फेरविचार याचिका न्यायमूर्ती भानुमती, अशोक भूषण आणि ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर निर्भयाच्या आईने आनंद व्यक्त केला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करते, अशी प्रतिक्रिया तिने दिली.