उरण : प्रतिनिधी
तालुक्यातील उरण-पनवेल रोडवर जासई दास्तान फाटा येथे जेएनपीटीने 32 कोटी खर्चून उभारलेल्या भव्य दिव्य 20 मीटर उंचीचे शिवस्मारक पर्यटकांसाठी 10 दिवसांनंतर खुले करण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीटी वरिष्ठ प्रबंधक तथा सचिव जयंत ढवळे यांनी दिली.
उरण तालुक्यातील जासई-दास्तानफाटा दरम्यान जेएनपीटी प्रशासनाने 32 कोटी खर्चुन 19.3 मीटर उंचीचे भव्य शिवस्मारक नऊ हजार चौरस मीटर क्षेत्रात उभारण्यात आले आहे. पाच मजल्यापर्यंत उभारण्यात आलेल्या तळ मजल्यावर 480 चौरस मीटरचा भव्य बहुउद्देशीय सभागृह आहे. या सभागृहात कॅन्टीन, ग्रीनरुम आणि संग्रहालय उभारण्यात आले आहे. या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. पहिल्या मजल्यावर दोन खुल्या बाल्कनी आहे. दुसर्या मजल्यावरील एक्झीब्युशन हॉलमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक ऐतिहासिक चित्र, शिल्प, पेंटिंगचे प्रदर्शन लावण्यात आली आहेत. कारागृहात शिक्षा भोगणार्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शिक्षेच्या प्रसंगाचेही अप्रतिम शिल्प उभारण्यात आले आहे. त्यानंतर तिसर्या आणि चौथ्या मजल्यावर विह्यूज गॅलरी आणि महाराजांच्या जीवनपटावर ऑडिओ व्हिज्युअल सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे. स्टेजच्याच मागे एमपी थिएटर उभारण्यात आले आहे. पाचव्या आणि अखेरच्या मजल्यावर सहा मीटर उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि चार मीटर उंचीचा समर्थ रामदास स्वामी यांचा अष्टधातुंचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. राज्यातील इतक्या मोठ्या उंचीचे हे एकमेव स्मारक आहे.
17 फेब्रुवारी 2019 रोजी या शिवस्मारकाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे हे शिवस्मारक मागील दोन वर्षे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. 10 दिवसांनी हे स्मारक पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे.
कोविड दरम्यान मागील दोन वर्षांपासून मंदिरे असलेली अनेक संग्रहालय बंद ठेवण्यात आली होती. आता मात्र बंदीचे निर्बंध उठविण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांकडून नाममात्र प्रवेश फी आकारणी करीत हे शिवस्मारक येत्या दहा दिवसातच पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे.
-जयंत ढवळे, वरिष्ठ प्रबंधक तथा सचिव, जेएनपीटी