गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवर प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण
पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवरील प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण शिबिराला शुक्रवार (दि. 8)पासून सुरुवात झाली. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या शिबिराचा आमदार प्रशांत ठाकूर आणि कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनचे संस्थापक चेअरमन डॉ. योगेंद्र सपरू यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ झाला.
सीकेटी महाविद्यालयात होत असलेल्या या शिबिराच्या शुभारंभास जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापौर डॉ. कविता चौतमोल, कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनच्या सीईओ अलका बिसेन, कार्यकारी संचालिका डॉ. धनंजया सारनाथ, डॉ. भावना शर्मा, उपमहापौर सीताताई पाटील, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहराध्यक्ष वर्षा नाईक, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, प्रभाग समिती अॅड. सभापती वृषाली वाघमारे, नगरसेविका राजेश्री वावेकर, डॉ. संतोष आगलावे, डॉ. कृष्णा देसाई, डॉ. राजेश सोनार, क्रीडा शिक्षक डॉ. विनोद नाईक, डॉ. आर. व्ही. येवले आदी उपस्थित होते.
गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी एचपीव्ही नामक चाचणी करावी लागते आणि ही चाचणी महागडी असल्याने महिलावर्गाकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. बाजारात या एका चाचणीसाठी सुमारे सात ते नऊ हजार रुपयांचा खर्च येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा एचपीव्हीच्या हाय रिस्क विषाणूमुळे होतो.
महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाण असलेल्या कॅन्सरमध्ये या कॅन्सरचा दुसरा क्रमांक लागतो. महिलांमध्ये धडकी भरवणारा सर्व्हिकल म्हणजेच गर्भाशय मुखाचा कॅन्सर ही जगभर मोठी समस्या आहे.
गर्भाशय मुखाच्या कॅन्सर निर्मूलनासाठी ऑक्टोबर 2021मध्ये सीकेटी महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत लसीकरण डोस महाशिबिर झाले होते. या शिबिरात एक हजार मुलींचे मोफत लसीकरण झाले. त्या पहिल्या डोस घेतलेल्या लाभार्थींना दुसरा डोस देण्यासाठी या शिबिराचे आयोजन 8 व 9 एप्रिल रोजी करण्यात आले आहे.
गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असलेला एकमेव कॅन्सर आहे. 2008मध्ये सर्वप्रथम इंग्लंडमध्ये एचपीव्ही लस देण्यास सुरुवात झाली. लसीकरणानंतर गर्भाशय मुखाच्या कॅन्सर रुग्णांमध्ये सुमारे 90 टक्के घट झाली आहे. 14 ते 16 वर्ष वयोगटातील मुलींमध्ये गर्भाशय मुखाच्या कॅन्समध्ये 62 टक्के, तर 16-18 वर्ष वयोगटात सुमारे 34 टक्के एवढी घट झाली आहे. त्यामुळे या लसीची परिणामकारकता स्पष्ट झाली आहे.
जगातील सुमारे तीन लाख महिलांचा गर्भाशय मुखाच्या कॅन्सरमुळे मृत्यू होत असल्याचे जागतिक आकडेवारीतून समोर आले आहे. भारतात महिलांमध्ये हे प्रमाण लक्षणीय आहे. गर्भाशय मुखाच्या सर्व प्रकारच्या कॅन्सरसाठी एचपीव्ही विषाणू कारणीभूत आहे. कमी रोगप्रतिकारशक्ती, तंबाखूचे अतिसेवन किंवा धूम्रपान, असंतुलित आहार, मांसाचे सेवन, मद्यपान, लैंगिक संबंधांतून होणारे संसर्ग, मानसिक ताण-तणाव, लठ्ठपणा असे जीवनशैलीशी निगडित बदलही या कर्करोगाच्या तीव्रतेला कारणीभूत ठरतात, असे तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात येते.
एचपीव्ही लसीकरणामुळे जागतिक स्तरावरील गर्भाशय मुखाच्या कॅन्सरमध्ये घट झाली आहे. भारतात या कॅन्सरचे प्रमाण हे अल्प उत्पन्न गटांतील महिलांमध्ये अधिक आहे. यावरील लसीची किंमत हा भारतातील चित्र बदलण्यामागील मुख्य अडथळा आहे. त्यामुळे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल तसेच कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनच्या नेतृत्वाखाली सीकेटी महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर प्रतिबंधात्मक मोफत लसीकरणाचा मोफत उपक्रम राबवून लेकींच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली आहे.