Breaking News

नवी मुंबई महापालिका रुग्णालयातही सीटीस्कॅन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई महापालिकेने कोरोनोत्तर कालावधीत आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला. पालिकेच्या आरोग्य विभागामध्ये आतापर्यंत सोनोग्राफी, सीटी स्कॅन आदी सेवा खासगी संस्थेमार्फत पुरवल्या जात होत्या, तर विविध दुर्धर आजारांच्या तपासण्यांसाठी खासगी प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागत होते. आता या यंत्रणा पालिकेकडे आल्या आहेत. त्यामुळे महागड्या तपासण्या आता पालिका रुग्णालयांत मोफत मिळणार आहेत. यासाठी पालिकेचे नियोजन सुरू असल्याचे आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.

नवी मुंबई महापालिकेने करोडो रुपये खर्च करून शहरातील माता-बाल रुग्णालयांचे रूपांतर सार्वजनिक रुग्णालयांमध्ये केले आहे, मात्र वर्षांनुवर्षे रुग्णालयाच्या टोलेजंग इमारती केवळ फक्त शोभेच्या वस्तू ठरल्या होत्या; परंतु कोरोना काळात याच इमारतींमध्ये उत्तम आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न केला. खासगी रुग्णालयांसारख्या चांगल्या सुविधाही पालिका रुग्णालयात मिळत आहेत. वाशी येथील पालिका रुग्णालयात सीटी स्कॅन सुविधा सुरू केली जात आहे. आतापर्यंत एका खासगी संस्थेच्या मदतीने पालिका ही सुविधा देत होती, परंतु कोरोनाकाळात सामाजिक दायित्व फंडातून पालिकेने सीटी स्कॅन यंत्रणा घेतली आहे. त्याचबरोबर नेरूळ, ऐरोली येथील रुग्णालयातही कोरोना काळात चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत.

नेरूळ रुग्णालयातील पालिकेची प्रयोगशाळा विविध आजारांचे निदान व तपासणीसाठी उपयुक्त ठरली आहे. यापूर्वी पालिकेची स्वत:ची प्रयोगशाळा नसल्याने सामान्य रुग्णांची खासगी प्रयोगशाळेत लूट सुरू होती. भविष्यात पालिकेची प्रयोगशाळा सुरू झाल्यास सर्वसामान्यांची होणारी लूट थांबणार आहे.

पालिकेच्या आरोग्य सुविधा खासगी संस्थेमार्फत चालवण्यापेक्षा त्या पालिकेनेच चालवल्या पाहिजेत. सीटी स्कॅनची सेवा लवकरच पालिकेमार्फत चालवली जाणार आहे. इतरही महागड्या सुविधा पालिकेच्या रुग्णालयामध्ये उपलब्ध केल्या जाणार आहेत.

-अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply