Breaking News

नदीपात्रात बांधकाम, खारफुटीची कत्तल

अतिक्रमण हटविण्यासाठी खारगाव बुद्रुक ग्रामस्थांचे म्हसळा तहसीलदारांना निवेदन

 

म्हसळा ः प्रतिनिधी

शहराला लागूनच असलेल्या जानसई नदी पात्रात खारफुटी (मँग्रोज)ची कत्तल करून शासनाची कोणतीही परवानगी न घेता सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून कोळंबी प्रकल्प तयार करण्यासाठी आरसीसी पद्धतीचे पक्के बांधकाम करण्यात येत आहे. हे अतिक्रमण त्वरीत हटवावे, अशी मागणी खारगाव बुद्रुक ग्रामस्थांनी  म्हसळा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. जानसई नदी पात्रात पक्के बांधकाम करून खारे पाणी आडवले गेल्यास खारगाव बुद्रुक येथील दोन विहिरीत खारे पाणी शिरून गावात पाणीटंचाई निर्माण होणार आहे. नदी पात्रात पक्के बांधकाम झाल्यास परिसरातील गावांना पुराचा धोका होण्याचा संभव आहे. पुराचे पाणी जाऊन शेती नष्ट होण्याची भीती आहे, असे खारगाव बुद्रुक ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. नदीचे पात्रात पक्के बांधकाम करणे किंवा नदीच्या मुळ प्रवाहात बदल करण्यास कायदेशीर मनाई असताना तसेच संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केल्याने त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सरपंच अनंत नाक्ती यांनी सुरुवातीलाच केली होती. त्यानंतर सदरचे अनधिकृत बांधकाम हटविण्यात यावे, यासाठी खारगाव बुद्रुकचे सरपंच अनंत नाक्ती, कोळी समाज अध्यक्ष द्वारकानाथ पाटील, सेनेचे उपविभाग प्रमुख हेमंत नाक्ती, गणेश नाक्ती, बाळकृष्ण पांडव, दत्तात्रय कांबळे यांनी म्हसळा तहसीलदार कार्यालयात 13जानेवारीला तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र त्यावर काहीच कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांनी पुन्हा तहसीलदार समीर घारे यांच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे. जानसई नदी पात्रात केलेल्या अनधिकृत बांधकामाची योग्य दखल न घेतल्यास ग्रामस्थ उग्र आंदोलन करतील, असा इशाराही पुन्हा दिलेल्या तक्रार अर्जात देण्यात आला आहे.

खारफुटी (मँग्रोज)ची कत्तल करून जानसई नदी पात्रात दिवसाढवळ्या कोळंबी प्रकल्पासाठी पक्के बांधकाम होत आहे. त्याबाबत महसुल विभागाकडे दिलेल्या अर्जावर चार महिने कारवाई होत नाही तसेच खारफुटीच्या कत्तलीकडे शासन दुर्लक्ष करते, हे खेदाचे आहे.

-अनंत नाक्ती, सरपंच, खारगाव बुद्रुक, ता. म्हसळा

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply