Breaking News

काँग्रेस व पंजाब सरकारचा जाहीर निषेध ; पनवेलमध्ये भाजपची स्वाक्षरी मोहीम !

पनवेल : रामप्रहर वृत्त
पंजाबमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत हे दर्शविण्यासाठी पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फलक लावून सोमवारी (दि. 10) स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली आहे. या स्वाक्षरी मोहिमेला भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. पंजाबमधील काँग्रेस सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेव्यवस्थेत दाखविलेल्या निष्काळजीपणाचा या वेळी जाहीर निषेध करण्यात आला.
देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पंजाबमध्ये प्राणांतिक संकट ओढवले होते. त्यांचा ज्या राज्यात दौरा होता त्या पंजाबमधील काँग्रेस सरकारने पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत अक्षम्य दिरंगाई, बेजबाबदारपणा करून एक प्रकारे विघटनवादी शक्तींना मदत केली. त्यामुळे या घटनेचा आणि काँग्रेस सरकारचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी आयोजित वुई सपोर्ट पीएम मोदी या मोहिमेत कार्यकर्ते आणि नागरिकांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत असा संदेश व पाठिंबा देऊन स्वाक्षरी करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी विरूपाक्ष मंदिरात महामृत्यूंजय जप करण्यात आला.
या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, शहर अध्यक्ष रोहित जगताप, दिनेश खानावकर, अभिषेक भोपी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
पंतप्रधान मोदींचे काम काँग्रेसच्या डोळ्यांत खुपते -आमदार प्रशांत ठाकूर
या वेळी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, जेव्हा देशाचे पंतप्रधान राष्ट्रीय स्मारकाचे लोकार्पण करण्यासाठी पंजाबमध्ये गेले तेव्हा तो कार्यक्रम पक्षाचा नसून शासकीय होता, तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे भूमिपूजन शासकीय कार्यक्रमातून होणार होते. खराब हवामानामुळे पंतप्रधान हेलिकॉप्टरने न जाता रस्त्याने जाणार असल्याचे ठरल्याने तेथे बंदोबस्त ठेवणे आवश्यक होते, मात्र पंजाब सरकारकडून सुरक्षाव्यवस्थेत गंभीर चूक झाली. काँग्रेसचे मुख्यमंत्री प्रोटोकॉल न पाळता जाणूनबुजून पंतप्रधानांना विमानतळावर भेटायला गेले नाहीत. त्यानंतर जी निदर्शने झाली त्यातही काँग्रेसचे समर्थक होते. निदर्शने करणार्‍यांवर पंजाब सरकारने कारवाई केली नाही. त्याबाबत पाठपुरावा घेण्यासाठी फोन केला तर तोही घेतला नाही. अश्या परिस्थितीत पंतप्रधान एका असुरक्षित ठिकाणी 20 मिनिटे होते. ही परिस्थिती निवळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कार्यवाही करणे आवश्यक असतानाही त्यांनी काही केले नाही. याचे कारण 2014 सालापासून पंतप्रधान मोदी यांनी केलेले काम हे काँग्रेसच्या डोळ्यांत खूपत आहे.
आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे जागतिक पातळीवर कौतुक होत आहे. भारतात कधीही न घडलेली परिवर्तने घडत आहेत, नवा भारत घडत आहे. हे काँग्रेस पक्षाला पाहवत नाही. म्हणून पंतप्रधानांवर टीका करणे, त्यांना अपयश येईल यासाठी सगळ्या स्तरातून प्रयत्न काँग्रेस पक्ष करीत आहेत. याआधीही हे दिसून आले आहे आणि आता पंजाबच्या घटनेतूनही दिसून आले आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षिततेची तमा त्यांनी बाळगली नाही.

नरेंद्र मोदीजींच्या दीर्घायुष्यासाठी महामृत्यूंजय जप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयुष्य वाढावे यासाठी पनवेल शहरातील विरूपाक्ष मंदिरात आज महामृत्यूंजय मंत्राचा जप केला जात आहे. पक्ष कार्यालयात राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोसमोर उभे राहून काँग्रेस पक्षाचा भाजपने निषेध केला. पंजाबच्या घटनेमुळे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतप्त झालेले आहेत. जनतेच्या मनातही याबद्दल संताप आहे. लोक येऊन स्वाक्षर्‍या करून आपला निषेध व्यक्त करीत आहेत, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी सांगितले.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply