नवी मुंबई ः बातमीदार
देशापरदेशातील 20हून अधिक स्मारकांना भेटी देण्याचा योग आला असून त्यामध्ये बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांना अभिवादन करणारे नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले हे स्मारक पहिले आहे. स्मारकातील सुसज्ज ग्रंथालय व इतर वैशिष्ट्यपूर्ण सुविधांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याची धडपड दिसत असल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचे कौतुक साहित्यिक, व्याख्याते हरी नरके यांनी केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 30 मार्चपासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा केला जात असून जागर 2022 उपक्रमांतर्गत मान्यवर वक्त्यांची व्याख्याने श्रोत्यांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न होत आहेत. यामध्ये सोमवारी महात्मा फुले जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला साहित्यिक व व्याख्याते हरी नरके यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नजरेतून महात्मा फुले यांची विचारक्रांती या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांना जोडणारी 42 सूत्रे असल्याचे सांगत हरी नरके यांनी राजकीय स्वातंत्र्याआधी सामाजिक सुधारणेला महत्त्व देणारी महात्मा फुले यांची विचारधारा हा त्यांच्यामधील महत्त्वाचा धागा असल्याचे सांगितले. बाबासाहेबांनी केलेले कार्य हे देशातील सर्व समाज घटकांच्या भल्याचे असल्याचे स्पष्ट करीत हरी नरके यांनी बाबासाहेबांना एका समाजाच्या चौकटीत बंदिस्त करू नका, ते ’आमचे बाबासाहेब नाहीत’ तर ’आपले बाबासाहेब आहेत’ अशा शब्दात बाबासाहेबांच्या सर्वात्मकतेचा विशेष उल्लेख केला. कोणतीही वैचारिक चळवळ उभी करण्यासाठी एक आदर्श नजरेसमोर असावा लागतो, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महात्मा फुले यांनी नजरेसमोर ठेवला. रायगडावर जाऊन शिवरायांची समाधी शोधून काढली. शिवजयंती उत्सव सुरू केला. 1 जून 1869 साली पहिले शिवचरित्र लिहिले, ज्याची नोंद पुस्तक अभिरक्षक कार्यालयात आहे, अशी विस्तृत माहिती त्यांनी सोदाहरण सांगितली.