नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई पालिकेने कमी इंधनात जास्त प्रवासी वाहतूक करता यावी आणि कार्बन वापर कमी व्हावा यासाठी एनएमएमटीसाठी दहा डबल डेकर बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबपर्यंत पहिली डबल डेकर नवी मुंबईत येणार आहे. या दहापैकी एक बस ही पर्यटकांसाठी असून नवी मुंबई दर्शन घडविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त प्रवासी वर्दळ असलेल्या ठिकाणी डबल डेकर बस सुरू केल्यास कमी इंधनात जास्त प्रवासी वाहतूक करता येणार आहे. त्यासाठी दहा डबल डेकर बसेस येत्या काळात खरेदी केल्या जाणार असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. प्रायोगिक तत्त्वावर पहिली बस पावसाळ्यानंतर दाखल होणार असून या बससाठी चार वर्दळीचे मार्ग निश्चित करण्यात आलेले आहेत. नवी मुंबईच्या पामबीच मार्गावरून धावणारी डबल डेकर ही या शहराचे आकर्षण ठरणार आहे.