पोलिसांकडून नऊ वाहने हस्तगत; 12 गुन्ह्यांची उकल
पनवेल ः वार्ताहर
पनवेल, कामोठे, खारघर, रबाळे, कोपरखैरणे, परिसरातून 2021 मध्ये मोठ्या संख्येने मारुती इको कार चोरीस गेल्या होत्या. तसेच मुंबई आयुक्तालय व ठाणे आयुक्तालय हद्दीतूनदेखील मारुती इको कार चोरीस गेल्याच्या तक्रार पोलिसांकडे आल्या होत्या. या गाड्या चोरी करणार्या टोळीच्या नवी मुंबई गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. तीन आरोपींना ताब्यात घेत पोलिसांनी तमिळनाडू राज्यातून एकूण 54 लाखांच्या नऊ इको कार हस्तगत करून 12 गुन्हे उघडकीस आणले आहेत. गेल्या वर्षभरात पनवेल व नवी मुंबई परिसरातून मोठ्या संख्येने इको कार चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या. त्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, एका आरोपीचा संपर्क क्रमांक प्राप्त करून तपास सुरू केला. या गुन्ह्यात तीन आरोपी असून एक ओला कॅबचालक असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी शिताफीने आरोपी उस्मान सय्यद, शहानवाज शेख व अब्दुल सलाम शेख यांना कुर्ला व पनवेल परिसरातून अटक केली आहे. या तिघांना 14 दिवस पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर आरोपी उस्मान सय्यद याचेसह पथकाने तामिळनाडू राज्यामध्ये जाऊन आरोपींनी चोरी केलेल्या एकूण नऊ मारुती इको कार हस्तगत केल्या आहेत. आरोपींनी चोरी केलेल्या मारुती इको कार यांचे मूळ आरटीओ क्रमांक, इंजिन नंबर तसेच चेसीस नंबर नष्ट करून कारची मूळ ओळख पटवता येऊ नये याकरीता पुरावा नष्ट केल्याचे तसेच बनावट नंबर प्लेटचा वापर केल्याचे निष्पन्न झाल्याने नमूद गुन्ह्यात भादंवि. कलम 120 (ब), 201, 468, 471, 472, 34 वाढ करण्यात आली आहे.
चोरी करणारे सराईत गुन्हेगार अटकेत
पनवेल ः चोरी करणार्या तीन सराईत गुन्हेगारांना नवी मुंबई मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे 48 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 23 मोबाइल फोन असा एकूण तीन लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नवी मुंबई मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून घरफोडी करणारे सराईत आरोपींची माहिती प्राप्त केली व मिळालेल्या माहितीचे आधारे रबाळे परिसरात सापळा रचून शफिक अब्दुल शेख यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याने दिघा परिसरात घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दोन लाख 40 हजारांचे 48 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. तर दुसर्या गुन्ह्यात रबाळे परिसरात गुणाली तलाव सेक्टर 15 घणसोली येथे सापळा रचून मयूर दिपक रेंगे वय 18, रा. विटावा गाव, कोळीवाडा ठाणे आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना शिताफीने ताब्यात घेतले. या दोघांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्या दोघांनी मिळून रात्रीच्या वेळी भाग्यलक्ष्मी मोबाइल शॉपी, गावदेवीवाडी, घणसोली येथेे दुकानाचे शटर तोडून एकूण 23 मोबाइल चोरल्याचे कबूल केले. तसेच चोरी केलेले 23 मोबाइल फोन पोलिसांकडे जमा केले. याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने त्यांना पुढील कारवाईसाठी रबाळे पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.