पदवीधर तरुणांच्या अध्ययनाच्या कक्षा विस्तारून त्यांना अधिकाधिक रोजगारक्षम करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) आपला द्विपदवी कार्यक्रम नुकताच जाहीर केला. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गतच्या या कार्यक्रमामुळे यापुढे विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी, पदविका वा पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता येणार आहे. एवढेच नव्हे तर दोन वेगवेगळ्या शाखांचे किंवा वेगवेगळ्या विद्यापीठांचे अभ्यासक्रमही पूर्ण करता येणार आहेत. सद्हेतूने सुरू करण्यात आलेल्या एखाद्या योजनेच्या तपशीलांमध्ये न डोकावताच हे कसे काय अशी बोंबाबोंब करण्याची जुनी खोड आपल्याकडच्या अनेक तथाकथित पंडितांना आहे. तोच कित्ता द्विपदवी योजनेची घोषणा झाल्यावरही गिरवला गेला. दोन-दोन पदव्या घेऊन काय साध्य होणार? पदवीशिक्षणाचा रोख कौशल्यविकासावर नसल्यामुळेच पदवीनंतर विद्यार्थ्यांना अन्य अभ्यासक्रमांकडे वळावे लागते. दोन पदव्या एकाच वेळी साध्य केल्याने कौशल्यविकास होणार आहे का? दोन अभ्यासक्रम काही विद्यार्थ्यांना शक्य होतीलही, पण शिक्षणाच्या दर्जाचे काय, अशी ओरड करीत देशातील शैक्षणिक शोकांतिकेचे काय असा गळाही काहींनी काढला. हीच मंडळी काल-परवापर्यंत परदेशी विद्यापीठांमध्ये एकाच वेळी अनेक अभ्यासक्रम पूर्ण करण्याची सुविधा विद्यार्थ्यांना कारकीर्दीच्या नियोजनात कशी उपयुक्त ठरते याचे गोडवे गात होती. असो, देशातील शैक्षणिक वास्तव मुळापासून बदलण्यासाठीच केंद्रातील मोदी सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाची आखणी केली आहे. त्यामुळेच युजीसीने द्विपदवी योजनेची घोषणा करताना तपशीलवार नियमावलीही प्रसिद्ध केली. हे तपशीलच शिक्षणाचा दर्जा राखण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पदवीशिक्षणाच्या प्रक्रियेत मोठा बदल घडवून आणण्याची क्षमता या योजनेत आहे. अर्थात तिच्या अंमलबजावणीमध्ये अडथळे येऊ नयेत म्हणून विद्यापीठांनी काटेकोर नियोजन करणेही तितकेच आवश्यक आहे. संबंधित दोन्ही अभ्यासक्रम प्रत्यक्ष शिक्षणसंस्थेत प्रवेश घेऊन पूर्ण करावयाचे असल्यास दोन्ही अभ्यासक्रमांच्या तासिकांच्या वेळा एकत्र असू नयेत अशी अट युजीसीने घातली आहे. दोन्ही विद्यापीठांची परवानगी, पात्रतेचे निकषही पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. विद्यार्थ्यांना अधिकाधिक शैक्षणिक स्वातंत्र्य देण्याचा मूलभूत हेतू नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अंतर्भूत आहे. एकाच वेळी दोन अभ्यासक्रम पूर्ण करण्याला परवानगी नसल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कालावधी वाढतो. कित्येकांवर आर्थिक गरजेपोटी लवकर कमावते होण्याचा दबाव असतो. अशा गरजू विद्यार्थ्यांपैकी दोन अभ्यासक्रम पूर्ण करण्याची क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना नव्या व्यवस्थेचा लाभ निश्चितच होईल. काही वेळा पालकांच्या इच्छेपोटी विद्यार्थी एखाद्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. तो पूर्ण होता-होता त्यांना आपला कल वेगळ्याच अभ्यासक्रमाकडे असल्याची समज येते. खर्ची घातलेली वर्षे आणि मेहनत वाया जाऊ नये म्हणून ते हातातील अभ्यासक्रम पूर्ण करतात आणि नंतर स्वत:ला रूची असलेल्या अभ्यासक्रमाकडे वळतात. अशा विद्यार्थ्यांनाही या द्विपदवी योजनेचा लाभ घेता येऊ शकेल. विद्यार्थ्यांना एकाच वेळी भिन्न शाखांमधील अभ्यासक्रमाची संधी उपलब्ध करून देऊन विभिन्न कौशल्ये हस्तगत करण्यासाठी त्यांना मदत करण्याचे धोरण यामागे आहे. उदाहरणार्थ प्रोडक्ट डिझाइन शाखेच्या विद्यार्थ्यांना सोबतच फिल्म स्टडीज वा ग्राफिक डिझाइनचा एखादा लघुअभ्यासक्रम पूर्ण करता आल्यास त्यांना रोजगाराची चांगली संधी लवकर मिळू शकेल. विद्यार्थ्यांच्या गरजांचा साकल्याने अभ्यास करूनच ही द्विपदवी योजना आखण्यात आली असून अंमलबजावणीतूनच तिच्यातील त्रुटी वा अडथळे दूर करणे अधिक स्पष्ट होऊ शकेल.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …