Breaking News

स्वातंत्र्याची दिंडी उपक्रमाचा रायगडात शुभारंभ

अलिबाग : प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्याला 15 ऑगस्ट रोजी 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त रायगड जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात स्वातंत्र्याची दिंडी उपक्रम राबविण्यात येत असून, त्यानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा प्रारंभ  सोमवारी (दि. 8) वरसोली येथे रॅली काढून करण्यात आला. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याची दिंडी हा उपक्रम राबविण्यात येत असून, जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांच्या उपस्थितीत वरसोली येथील रॅलीला हिरवा झेंडा दाखिण्यात आला. वरसोली ग्रामपंचायत कार्यालयापासून रॅलीला  सुरुवात होऊन गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात सांगता करण्यात आली. रॅलीत भारतमातेची दिंडी काढण्यासोबत विद्यार्थ्यांनी भारतमाता तसेच शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती. रॅलीत देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. पथनाट्याच्या माध्यमातून हर घर तिरंगा अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली. या वेळी पर्यावरण संवर्धनाबाबत उपस्थितांना शपथ देण्यात आली. जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, माध्यमिक विभाग शिक्षण अधिकारी जोत्स्ना शिंदे-पवार, केंद्रीय संचार ब्युरो भारत सरकार अहमदनगर प्रतिनिधी फनीकुमार पी., जिल्हा क्रीडा अधिकारी सचिन निकम, नेहरू युवा केंद्र जिल्हा समन्वयक निशांत रौतेला, अलिबाग गटविस्तार अधिकारी ज्ञानेश्वर साळावकर, वरसोली सरपंच प्रमिला भाटकर, निवृत्त कॅप्टन उमेश वाणी, स्वातंत्र्यसैनिक अमरनाथ राणे, दामोदर पडवळ, जयवंत गायकवाड, मिलिंद कवळे, तपस्वी गोंधळी यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते.

स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून देशातील नागरिकांमध्ये देशभावना जागृत करण्याचा प्रयत्न स्वातंत्र्याची दिंडी उपक्रमातून करण्यात येत आहे. 13 ते 15 ऑगस्टदरम्यान सर्वांनी घरोघरी तिरंगा फडकावून देशाभिमान जपावा. प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करावे.

– निलेश घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सामान्य प्रशासन

जिल्हाभर रॅलींचे आयोजन

रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या सहकार्याने वरसोली येथे रॅली काढून स्वातंत्र्याची दिंडी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त वरसोलीसह जिल्ह्यातील विविध 75 गावांमध्ये 75 रॅलींचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व रॅलींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply