पनवेल : रामप्रहर वृत्त
कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले बँकचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे घोटाळेबाज विवेक पाटलांचा मुक्काम आणखी काही काळ तुरूंगातच असणार हे स्पष्ट झाले आहे. कोर्टाच्या या निर्णयाचे कर्नाळा बँक घोटाळ्यात भरडले गेलेले सर्वसामान्य ठेवीदार आणि खातेदारांनी स्वागत केले असून आनंद व्यक्त केला आहे.
कर्नाळा बँकेतील 529 कोटींहून अधिक रुपयांच्या घोटाळ्याला सर्वप्रथम आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून वाचा फोडली होती. ठेवीदार आणि खातेदारांना न्याय मिळावा आणि घोटाळा करणार्या सर्व दोषींना कडक शिक्षा व्हावी यासाठी दोन्ही आमदारांनी या घोटाळाप्रकरणी राज्य सरकारकडे पुराव्यानिशी सातत्याने पाठपुरावाही केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मात्र कारवाई करण्याऐवजी विवेक पाटलांना अभय दिले.
या घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात पैशांची अफरातफर झाली असल्याने आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी या संदर्भात भ्रष्टाचार्यांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासमवेत सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीचे लक्ष वेधलेे. ईडीने त्याची दखल घेत विवेक पाटील यांना 15 जून 2021 रोजी राहत्या घरातून अटक केली. त्यानंतर ईडीने त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात केली. दरम्यान, विवेक पाटील यांच्या वकिलांनी वैद्यकीय कारणाखाली त्यांना आर्थर रोड जेलऐवजी तळोजा कारागृहात हलवण्याची मागणी केली. ती मंजूर करण्यात आली.
तपासादरम्यान ईडीने विवेक पाटील यांच्यावर आरोपपत्र दाखल केले. त्यावरील सुनावणीत पाटील यांनी जामिनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता. यावर सत्र न्यायालयात वेगवेगळ्या तीन अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी सुनावणी केली. त्याचा निकाल सोमवारी (दि. 18) लागला. कोट्यवधींचा गैरव्यवहार आणि हजारो ठेवीदारांच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा पाहता सत्र न्यायालयाने विवेक पाटील यांचा जामीन अर्ज फेटाळला.
या खटल्याच्या एकूण 38 वेळा तारखा पडून कामकाज झाले. यात ‘ईडी’तर्फे अॅड. सुनील गोन्साल्वीस, अॅड. वेनेगावकर यांनी काम पहिले, तर विवेक पाटील यांच्यातर्फे अॅड. सुबीर सरकार, अॅड. पवन चेढ्ढा, अॅड. ऋषिकेश मुंदरगी, अॅड. अशोक मुंदरगी, अॅड. राहुल ठाकूर, अॅड. चेतन ठाकूर यांनी बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला आहे.
कानठळ्यांच्या वल्गना हवेत विरल्या!
कर्नाळा बँक घोटाळ्यात माजी आमदार विवेक पाटील यांची जामिनावर का होईना, पण सुटका होईल, अशी भाबडी आशा शेकाप पुढारी आणि कार्यकर्त्यांना होती. त्यामुळे काही अतिउत्साहींनी तर आमचे साहेब सुटल्यावर इतके फटाके वाजवू की, आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या कानठळ्या बसल्या पाहिजेत, अशा वल्गना केल्या होत्या, मात्र विवेक पाटील यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्याने शेकापवाल्यांच्या वल्गना हवेत विरल्या असून त्यांची बोलतीच बंद झाली आहे. न्यायालयाचा हा निर्णय घोटाळा आणि घोटाळेबाजांचे समर्थन करणार्यांना जोरदार चपराक मानली जात आहे.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …