बाजारपेठ पाण्याखाली; साळाव चेकपोस्टजवळ दरड कोसळली
रेवदंडा : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील येसदे, साळाव, सुरई परिसरात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे बोर्ली बाजारपेठ पाण्याखाली गेली, त्यात व्यापार्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. साळाव चेकपोस्ट येथे रात्रीच्या सुमारास दरड कोसळली, तर येसदे ते शिरगाव या मुख्य रस्त्यावर पाणी व मातीचा चिखल झाला.
येसदे, साळाव, सुरई डोंगर भागात सोमवारी (दि. 6) रात्री अकरा वाजल्यापासून मंगळवारी पहाटे चार वाजेपर्यंत प्रचंड अतिवृष्टी झाली. बोर्ली बाजारपेठत पावसाचे पाणी घुसले. या बाजाारपेठेत सुमारे सहा फुट पाणी होते. बाजारपेठेतील सर्वच दुकानात पाणी शिरल्याने हाहाकार उडाला, दुकानातील फ्रिज, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, झेरॉक्स, मशीन आदीचे मोठे नुकसान झाले. हॉटेल व्यावसायिकांनाही नुकसानीचा जबर फटका बसला आहे. दुकानातील धान्य, कडधान्य, तेल, कांदे, बटाटे आदी जीवनाश्यक वस्तूंचे नुकसान झाले. मंगळवारी पहाटे पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाणी ओसरण्यास सुरूवात झाली.
या पुरात बोर्ली बाजारपेठची पुरती वाताहत झाली. गावाच्या परिसरात अनेक ठिकाणी भराव झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. पाणी वाहून जाण्याचा मार्गात अनेक बांधकामे नव्याने झाल्याने बोर्ली बाजारपेठे पाणी घुसले असल्याची तक्रार येथील व्यापारी करतात.
पावसाचे पाण्यासह माती शिरगाव ते बोर्ली या मुख्य रस्त्यावर आली. त्यामुळे या रस्त्यावर चिखलाचे साम्र्राज्य निर्माण झाले. या वेळी परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. मोबाइल टॉवर तुटल्याने बाहेरील लोकांशी संपर्क करणे कठीण झाले होते.
बोर्लीचे सरपंच डॉ. चेतन जावसेन यांनी ग्रामपंचायत कर्मचार्यांसह व्यापारी व दुकानदारांशी संपर्क केला व तातडीने पंचनाम्यास सुरूवात केली. बोर्ली बाजारपेठ व गावातील 175 जणांचे नुकसान झाल्याचे पंचनामे करण्यात आले असल्याचे डॉ. जावसेन यांनी सांगितले.
साळाव चेकपोस्टनजीक दरड कोसळून रात्री अकराच्या सुमारास डोंगरातील माती पाण्यासह वाहत आल्याने साळाव चेकपोस्ट-रोहा आणि साळाव चेकपोस्ट ते मुरूड रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता.
साळाव चेकपोस्ट पोलिसांनी तात्काळ रेवदंडा पोलीस ठाण्याशी संपर्क केला. त्यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्याचे निरिक्षक अशोक थोरात, उपनिरिक्षक विनोद चिमडा, मुरूड तहसीलदार गोविंद वाकडे, नायब तहसीलदार रवींद्र सानप तातडीने घटनास्थळी दाखल झाले. साळाव येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या जेसीबीच्या सहाय्याने रस्तावर आलेली माती बाजूला करून दोन्ही बाजूकडील मार्ग वाहतुकीस खुले केले. शिरगाव नजीकच्या मुख्य रस्त्यावरही चिखलाचे साम्राज्य झाले होते मात्र वाहतूक सुरळीत सुरू होती.